मुंबई: गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील गिरनार पर्वतावर असलेल्या गोरखनाथ मंदिरावर अनोळखी व्यक्तींनी तोडफोड केली. यावेळी त्यांनी मूर्तीचीही विटंबना केली आहे. पोलिसांकडून रविवारी ही माहिती देण्यात आली आहे. मंदिरात झालेल्या या तोडफोडीमुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून भाविकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. संगमरवरी मूर्तीचे शीर तोडण्यात आले. त्याचबरोबर मंदिराच्या काचेच्या दरवाजासह इतर वस्तूंचंही नुकसान करण्यात आलं आहे.
गिरनार पर्वतावर असलेल्या भगवान गोरखनाथांच्या मंदिरात अज्ञात लोकांनी तोडफोड केली. गोरखनाथ हे हिंदू धर्मातील एक पूज्य योगी आणि नाथ संप्रदायाचे संस्थापक मानले जातात. 1 हजार 117 मीटर उंचीवरील शिखरावर असलेल्या या मंदिरात झालेल्या तोडफोडीमुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लोकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गिरनार पर्वतावरील मंदिरात गुरु गोरखनाथांच्या मूर्तीची शनिवारी रात्री उशिरा तोडफोड करण्यात आली. तक्रार मिळाल्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला असल्याचे जुनागढचे पोलीस अधीक्षक सुबोध ओडेदरा यांनी सांगितलं. गिरनार पर्वताला रेवतक पर्वत असेही म्हणतात. यावर जैन आणि हिंदू मंदिरं आहेत. भाविकांना शिखरावर पोहोचण्यासाठी 10 हजार दगडांच्या पायऱ्या चढाव्या लागतात. या पर्वतावर जैन मंदिरं अंदाजे दोन-तृतीयांश उंचीवर आहेत. यातील सर्वात मोठं आणि जुनं 12 व्या शतकातील नेमिनाथ मंदिर आहे, जे 22 व्या तीर्थंकरांना समर्पित आहे. या पर्वतावर अनेक हिंदू मंदिरं आहेत, त्यात देवी अंबा मातेच एक प्रसिद्ध मंदिरही आहे.