Emergency Exit Attempt: क्वालालंपूरहून केरळमधील कोचीकडे येणाऱ्या 'बॅटिक एअर'च्या विमानात एका प्रवाशाच्या बेजबाबदार कृत्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. उड्डाणादरम्यान एका माथेफिरू प्रवाशाने चक्क आपत्कालीन दरवाजाच्या खिडकीचे आवरण (पॅनेल) तोडून, दरवाजाच उघडण्याचा हिंसक प्रयत्न केला. यामुळे विमानात एकच गोंधळ आणि घबराट पसरली. मात्र, केबिन क्रू आणि तत्पर सहप्रवाशांनी वेळेवर मध्यस्थी करत या 36 वर्षीय प्रवाशाला आवरल्याने पुढील धोका टळला.
किंचाळ्या आणि गोंधळ: मध्यरात्री घडला थरार
पोलीस तक्रारीनुसार, हा संपूर्ण प्रकार रात्री 9:30 ते 11:05 च्या सुमारास घडला. सीट क्रमांक 12A वर बसलेल्या जमशीर नावाच्या प्रवाशाने अचानक विचित्र आणि आक्रमक वर्तन करण्यास सुरुवात केली. त्याने लाथा मारून आपत्कालीन खिडकीचे कव्हर फोडले आणि मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्यासाठी पुढे आलेल्या कर्मचाऱ्यांना त्याने धक्काबुक्की करत धमकावले. संपूर्ण विमानाच्या सुरक्षेला धोक्यात आणणाऱ्या या कृत्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
विमानतळावर उतरताच आरोपीला अटक
नेडुंबसेरी येथील 'कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर' विमान सुरक्षितपणे लँड होताच सुरक्षा यंत्रणांनी (CISF) तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. जमशीर अथाणिक्कल (वय 36, रा. पालक्काड) असे या प्रवाशाचे नाव असून त्याला स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 'बॅटिक एअर'च्या OD231 (बोईंग 737) या विमानात ही धक्कादायक घटना घडली असून, आरोपीने असे प्राणघातक कृत्य का केले, याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.