मुंबई येथील मालाड परिसरात झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. या आगीत सुमारे ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई येथील मालाड पुर्व परिसरात जामऋषी नगर (आंबेडकर नगर) या वन जमिनीवर असलेल्या झोपडपट्टीला सोमवारी १३ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी भीषण आग लागली. १५ सिलेंडरचा स्फोट होऊन हि आग लागली आहे. या आगीत १० ते १५ झोपडीधारक जखमी झाले आहेत. तर ५० पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीच्या गदारोळात १४ वर्षीय मुलाच्या तरुणाच्या गळामध्ये पत्र्याचा तुकडा घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
आगीसार धुराचे लोट परिसरात पसरताच स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.
घटनास्थळी प्लास्टिक आणि लोखंडी पत्र्यांच्या झोपड्या आहेत. सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान एक सिलेंडर फुटला. फुटलेल्या सिलेंडरमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. एका- मागून एक अशी १५ सिलेंडर फुटल्याची प्राथमिक माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.