सोशल मीडियावर लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी फसवणूक करणारे अनेकदा बनावट जाहिरातींचा आधार घेतात. आकर्षक ऑफर, कमी कागदपत्रांमध्ये मोठे कर्ज किंवा सरकारी योजनेच्या नावाखाली आर्थिक मदत देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केली जाते. सध्या अशाच एका नव्या फसवणुकीची चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये आधार कार्डवर तीन लाख रुपयांचे कर्ज मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
या जाहिरातीत ‘प्राइम मिनिस्टर लोन स्कीम’ अंतर्गत केवळ आधार कार्डवर तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, असे सांगितले जात आहे. यासाठी फार कमी कागदपत्रांची गरज असल्याचा दावा केला जातो. जाहिरातीत सरकारी योजनांसारखे दिसणारे ग्राफिक्स, “Apply Now” सारखे शब्द, तसेच QR कोड आणि लिंक दिल्या जात आहेत, ज्यामुळे लोकांचा विश्वास बसावा.
मात्र सरकारने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. PIB Fact Check ने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, अशा प्रकारची कोणतीही अधिकृत योजना अस्तित्वात नाही. सरकारकडून ‘प्राइम मिनिस्टर लोन स्कीम’ नावाने आधार कार्डवर तीन लाख रुपयांचे कर्ज दिले जात नाही. त्यामुळे अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
FRAUD ALERT! A sponsored advertisement on YouTube claims to offer a loan of ₹3 lakh under the Prime Minister Loan Scheme.#PIBFactCheck: ❌The claim is #FAKE. ✅ The Government of India is NOT endorsing any such advertisement or scheme. ⚠️ Stay vigilant. Visit… pic.twitter.com/RbxtHRbFCJ — PIB Fact Check (@PIBFactCheck) April 15, 2026
अनेक वेळा अशा जाहिरातींमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास वापरकर्ते बनावट वेबसाइट किंवा अॅपवर पोहोचतात. तेथे आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँक खाते, ओटीपी किंवा इतर वैयक्तिक माहिती मागितली जाते. ही माहिती मिळाल्यानंतर फसवणूक करणारे लोक आर्थिक गैरव्यवहार करू शकतात.
अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी सोशल मीडियावर दिसणाऱ्या संशयास्पद जाहिरातींवर क्लिक करणे टाळावे. कोणतीही योजना खरी आहे की नाही, हे नेहमी सरकारी पोर्टल किंवा अधिकृत संकेतस्थळावर तपासावे. तसेच अनोळखी वेबसाइट किंवा अॅपवर वैयक्तिक माहिती शेअर करू नये.
जर सोशल मीडियावर अशा प्रकारची जाहिरात दिसली, तर ती त्वरित रिपोर्ट करावी. फसवणूक करणाऱ्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आणि कोणत्याही मोठ्या आमिषापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.