पुणेकरांसाठी म्हाडानं मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील ६०५८ सदनिकांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी म्हाडाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे म्हाडाच्या ६ हजार ५८ सदनिकांच्या सोडतीसाठी म्हाडाने मुदतवाढ दिली आहे. यंदा प्रथमच ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे कागदपत्रे जमा करण्याची अट होती. त्यात अडथळे येत असल्याने अनेकांना अर्ज करणे अडचणीचे ठरत होती. त्यामुळे येत्या २५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणा- यास प्रथम प्राधान्य अंतर्गत २९३८ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनअंतर्गत २४८३ सदनिका व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६३७ सदनिका असे एकूण ६०५८ सदनिकांच्या संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनचा शुभारंभ ५ जानेवारीला करण्यात आला होता. ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत ६ फेब्रुवारी होती. मात्र, मुदत वाढवण्याचा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आला आहे.
पुणे मंडळामार्फत काढण्यात येणा-या या ऑनलाईन सोडतीमध्ये कलाकार, स्वातंत्र्यसैनिक, आमदार / खासदार आरक्षण असणा-या व्यक्तींना सदर आरक्षण प्रमाणपत्र मिळण्याकरिता वारंवार येणा-या अडचणी लक्षात घेऊन प्रमाणपत्र सादर करणेकरिता सूट देण्यात आली आहे. सदर अर्जदारांनी घराचा ताबा घेतेवेळी सदर आरक्षण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
सदनिकांची ऑनलाइन सोडत गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह आणि उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ मार्चला पार पडणार आहे. ही ऑनलाइन सोडत ही संपूर्णपणे पारदर्शी असून, म्हाडाने कोणत्याही एजंटची नेमणूक केलेली नाही. संगणकीय सोडतीमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ शकत नाही.