मुंबई, २ जून २०२३, प्रतिनिधी : १९८३ च्या विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघाने दिल्लीत निदर्शने करणाऱ्या भारतीय स्टार कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शवला आहे. या संघाचे कर्णधार कपिल देव होते. या संघाने एका संयुक्त निवेदनाद्वारे आंदोलक कुस्तीपटूंसोबत झालेल्या गैरवर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. कुस्तीपटू बजरंग पूनिया, साक्षी मलिक व विनेश फोगाट यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात शड्डू ठोकलेत. त्यांनी राजधानी दिल्लीत जवळपास महिनाभर आंदोलन केले. पण दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बळजबरीने त्यांना आंदोलन स्थळावरून हटवले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर देशात संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाने या कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शवला आहे.
१९८३ चा विश्वचषक जिंकणाऱ्या क्रिकेट संघाने बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या पैलवानांचे समर्थन केले आहे. तसेच त्यांना त्यांचे मेडल्स गंगा नदीत विसर्जित न करण्याचेही आवाहन केले आहे कपिल देव यांच्या नेतृत्वातील या संघात सुनील गावसकर, BCCI अध्यक्ष रोजर बिन्नी, दिलीप वेंगसरकर व मदनलाल यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे. या सर्वांनी पैलवानांसोबत घडलेला घटनाक्रम अत्यंत दुःखद असल्याचा दावा केला आहे. कुस्तीपटूंसोबत घडलेला प्रसंग अत्यंत दुःखद आहे. या कुस्तीपटूंनी देशाचा मानसन्मान वाढवला. त्यामुळे त्यांच्या मागण्या ऐकल्या जातील अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
१९८३ चा चॅम्पियन संघ एका संयुक्त निवेदनात म्हणाला – ‘आमच्या चॅम्पियन कुस्तीपटूंशी झालेल्या गैरवर्तनामुळे आम्ही व्यथित झालो. परेशान झालो. आम्हाला सर्वाधिक काळजी या गोष्टीची वाटते की, ते आपला घाम गाळून जिंकलेले मेडल्स गंगा नदीत विसर्जित करण्याचा विचार करत आहेत. ही पदके जिंकण्यासाठी वर्षानुवर्षांची मेहनत, त्याग, दृढनिश्चय व संयम लागतो. ती पदके केवळ त्यांचीच नसून देशाची शान आहेत. या प्रकरणी घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नये, असे आवाहन आम्ही त्यांना करतो. आम्ही आशा करतो की त्यांच्या तक्रारी लवकरात लवकर ऐकल्या जातील व त्यांचे निराकरण केले जाईल.