देशात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी (LPG) गॅसला पर्याय म्हणून आता इथेनॉल (Ethanol) या जैवइंधनाचा वापर करण्याचा गंभीरपणे विचार सुरू आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण यशस्वी ठरल्यानंतर आता घरगुती स्वयंपाकासाठी इथेनॉल स्टोव्ह उपलब्ध करून देण्याच्या दिशेने केंद्र सरकार काम करत आहे. त्यामुळे भविष्यात स्वयंपाकघरात एलपीजीसोबत इथेनॉलचाही पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
इथेनॉल म्हणजे नेमकं काय?
इथेनॉल हे ऊस, मका, तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनांपासून तयार होणारे जैवइंधन आहे. हे तुलनेने स्वच्छ इंधन मानले जाते. सध्या वाहनांसाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून वापरले जात आहे. आता त्याच इंधनाचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल का, यावर सरकार आणि संबंधित तज्ज्ञ काम करत आहेत.
सरकारचा नेमका विचार काय आहे?
देशातील एलपीजीचा मोठा हिस्सा परदेशातून आयात केला जातो. जागतिक बाजारातील चढ-उतार किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजीच्या किमती वाढतात. त्यामुळे स्वदेशी आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधण्यावर सरकारचा भर आहे. याच पार्श्वभूमीवर इथेनॉल स्टोव्हचा वापर वाढवण्यासाठी धोरण तयार केले जात आहे.
इथेनॉल स्टोव्ह कसे असतील?
हे स्टोव्ह गॅस सिलिंडरवर चालणार नाहीत. त्यामध्ये द्रवरूप इथेनॉल भरले जाईल आणि त्याद्वारे स्वयंपाक करता येईल. हे स्टोव्ह सुरक्षित, वापरण्यास सोपे आणि कमी प्रदूषण करणारे असावेत यासाठी विशेष तांत्रिक निकष ठरवले जाणार आहेत.
सरकारचा उद्देश एलपीजी बंद करण्याचा नसून, ग्राहकांना आणखी एक पर्याय उपलब्ध करून देण्याचा आहे. सुरुवातीला काही शहरांमध्ये किंवा निवडक भागांत या प्रकल्पाची चाचणी घेतली जाऊ शकते. त्यानंतरच मोठ्या प्रमाणावर याचा विस्तार होईल.