वॉशिंग्टन: जगातील सर्वात प्रसिद्ध उद्योजकांपैकी एक असलेले एलन मस्क यांनी पुन्हा एकदा थेट आणि धक्कादायक अंदाज व्यक्त करत जागतिक स्तरावर चर्चेला तोंड फोडले आहे. टेस्लाचे मालक असलेल्या मस्क यांनी येत्या काही वर्षांत जग मोठ्या युद्धाच्या शक्यतेकडे वाटचाल करत असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या एका छोट्याशा पोस्टने आंतरराष्ट्रीय राजकारणापासून संरक्षण क्षेत्रापर्यंत अनेक विश्लेषकांना सतर्क केले आहे. मस्क यांनी एक्सवरील चर्चेदरम्यान म्हटले की पुढील 5 ते 10 वर्षांत जगभरात मोठा संघर्ष उभा राहू शकतो आणि तो अणुयुद्धाच्या पातळीपर्यंतही जाऊ शकतो.
जागतिक प्रशासन, अणु-प्रतिबंध आणि राष्ट्रांमधील तणाव यांवर सुरू असलेल्या वादविवादात मस्क यांनी टाकलेला हा अंदाज चिंतेची नवी लाट निर्माण करणारा ठरला. ट्रम्प प्रशासनासोबत काम करत असताना त्यांनी घेतलेल्या अनुभवाचा उल्लेख काही विश्लेषकांनी जोडला, मात्र मस्क यांनी कोणत्याही राष्ट्राचे नाव घेतले नाही. एक्सवरील Hunter Ash या वापरकर्त्याने केलेल्या पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी हे विधान नोंदवले. त्या पोस्टमध्ये जगातील सरकारे आंतरराष्ट्रीय युद्धाच्या भीतीपासून मुक्त असल्याने अधिक ढिसाळ आणि अप्रभावी होत चालल्याचा दावा करण्यात आला होता.
यावर प्रतिसाद देताना मस्क म्हणाले की “युद्ध अटळ आहे; 5 वर्षांत किंवा जास्तीत जास्त 10 वर्षांत.” 2030 चा संभाव्य कालावधी त्यांनी सूचित केल्याने राजकीय समीकरणांकडे पुन्हा एकदा जगाचे लक्ष वळले आहे. तथापि, मस्क यांनी या इशाऱ्यामागील नेमके संकेत स्पष्ट केले नाहीत. तैवानपासून युक्रेनपर्यंत जगातील अनेक हॉटस्पॉट प्रदेशांमध्ये तणाव कायम असताना मस्क यांच्या एकाच वाक्याने चर्चेला हवा मिळाली आहे. काही विश्लेषकांचा अंदाज आहे की त्यांच्या AI आधारित Grok platform नुसार अलीकडील जागतिक अस्थिरतेवर आधारीत निरीक्षणे नोंदवली आहेत, ज्याचा विचार त्यांच्या या विधानात परावर्तित होऊ शकतो.
दरम्यान, मस्क यांनी मानवी जीवनशैलीवर एआयचा होणारा प्रभावही पुन्हा अधोरेखित केला आहे. एका पॉडकास्टवर बोलताना ते म्हणाले की “एआय आणि रोबोटिक्स इतक्या वेगाने विकसित होत आहेत की भविष्यात लोकांना काम करण्याची गरज उरणार नाही. काम करणे हे त्यांच्या आवडीवर अवलंबून असेल, गरजेवर नाही.” तज्ज्ञांच्या मते, तंत्रज्ञानाचे हे आक्रमक रूपांतरही जागतिक असमतोल वाढवू शकते.
मस्क यांची भविष्यवाणी ही नवी नाही. पाच वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या अनेक तांत्रिक भाकितांचा प्रत्यय जगाला प्रत्यक्षात आला आहे. त्यामुळे त्यांच्या ताज्या अंदाजाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी अनेक देश स्थित्यंतराचा अंदाज घेत धोरणात्मक स्तरावर सज्ज होऊ लागले असल्याचे विश्लेषण पुढे येत आहे. एलन मस्कयांच्या एका पोस्टने पुन्हा एकदा जगाला अस्वस्थ करणारा प्रश्न विचारला आहे, भविष्य सुरक्षित आहे की अज्ञात संकटाच्या दिशेने झुकत आहे?
हेही वाचा: Ind vs SA 2nd ODI: भारत आघाडी कायम ठेवणार? दुसऱ्या वनडेसाठी रंगणार निर्णायक सामना