शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. सक्तवसुली संचालनालयाने अनिल परब यांच्या निवासस्थानी छापा टाकला आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे आता अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
गुरुवारी सकाळी ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा टाकला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्यावर ईडीने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर छापा टाकला. गुरुवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ईडीने ही कारवाई केली आहे.
सचिन वाझे १०० कोटी वसुली प्रकरणी अनिल परब यांचे नाव आले होते. तसेच राज्यांतील पोलीस बदल्यांमध्येही अनिल परबांचं नाव समोर आलं. दरम्यान, दापोलीतील अनधिकृत रेसॉर्टप्रकरणी अनिल परब ईडीच्या रडारवर होते. त्यानंतर पर्यावरण मंत्रालयाने दापोली न्यायालयात परबांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला, अशा अनेक गैरव्यवहारांमध्ये अनिल परब यांचं नाव समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज ईडीने केलेल्या कारवाईमुळे अनिल परबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
परबांच्या या ७ ठिकाणी ईडीची कारवाई :
अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी तपासणी
वांद्रयातील खासगी घरावर तपासणी
दापोलीतील साई रिसॉर्टवर तपासणी
परबांशी निगडित एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी तपासणी
कोथरूड, पुणे – परबांचे निकटवर्तीय विभास साठे यांच्या दोन घरी तपासणी
रत्नागिरी – परबांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरी तपासणी