मध्य अफ्रीका: कोरोना, हंताव्हायरस आणि इतर संसर्गजन्य आजारांच्या संकटातून जग पूर्णपणे सावरत नसतानाच आता आणखी एका घातक विषाणूने चिंता वाढवली आहे. आफ्रिकेतील काँगो देशात इबोला विषाणूचा पुन्हा उद्रेक झाल्याची माहिती समोर आली असून या संसर्गामुळे आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना आणि आफ्रिका सीडीसीने विशेष सतर्कता जारी केली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, काँगोच्या इतुरी प्रांतात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मोंगवालू आणि रवामपारा या भागांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. आतापर्यंत 245 हून अधिक संशयित रुग्णांची नोंद झाली असून काही नमुन्यांमध्ये इबोला विषाणूची पुष्टी झाली आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले की, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नमुने तपासण्यासाठी तज्ज्ञांचे पथक काँगोमध्ये पाठवण्यात आले होते. सुरुवातीच्या तपासणीत स्पष्ट निष्कर्ष समोर आला नव्हता, मात्र पुढील चाचण्यांमध्ये इबोलाशी संबंधित विषाणूची उपस्थिती आढळून आली.
इबोला हा अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक संसर्गजन्य आजार मानला जातो. संक्रमित व्यक्तीच्या रक्त, उलटी, घाम, वीर्य किंवा इतर शारीरिक द्रव्यांच्या संपर्कातून हा विषाणू पसरतो. सुरुवातीला ताप, अशक्तपणा, स्नायूंमध्ये वेदना अशी लक्षणे दिसतात, पण काही वेळातच परिस्थिती गंभीर होऊ शकते. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास मृत्यूचा धोका वाढतो.
विशेष म्हणजे, काँगोला यापूर्वीही इबोलाच्या साथीचा अनुभव आहे. मात्र यावेळी आढळलेला विषाणू वेगळ्या प्रकारचा असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शास्त्रज्ञ अजूनही या विषाणूच्या प्रकाराचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
संसर्गाचा धोका आता शेजारील देशांपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. युगांडामध्येही एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. संबंधित व्यक्ती काँगोमधून आल्याची माहिती समोर आली असून त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खाणकाम क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावरील हालचाल, सीमावर्ती भागातील सततची ये-जा आणि अपुरी आरोग्य सुविधा यामुळे संसर्ग नियंत्रणात आणणे कठीण ठरत आहे. खराब रस्ते आणि असुरक्षित परिस्थितीमुळे मदतकार्यावरही परिणाम होत आहे.