अमेरिका: मगील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेत आहेत. अशातच, डोनाल्ड ट्रम्प आता पुन्हा एकदा चर्चेत आले. याचं कारण म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय अमेरिकेसाठी आता मोठा डोकेदुखी ठरत आहे. कारण, अमेरिकन मका आणि सोयाबिनसाठी खरेदीदार मिळणे कठीण झाले आहे.
ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे, चीनने अमेरिकेकडून सोयाबिन खरेदी करणे थांबवले आहे. त्यामुळे, चीन आता सोयाबिनची गरज ब्राझील आणि अर्जेंटिना देशातून पूर्ण करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये अमेरिकेने 24.5 अब्ज डॉलर्स किंमतीचे सोयाबिन निर्यात केले होते. त्यापैकी तब्बल 12.5 अब्ज डॉलर्स किंमतीचे सोयाबिन खरेदी एकट्या चीनने केले होते. मात्र, आता चीनने अमेरिकेकडून सोयाबिनची खरेदी न केल्याने अमेरिकेला मोठा फटका बसला आहे. यादरम्यान, अमेरिकेने साठवलेल्या सोयाबिनची खरेदी करण्यासाठी आता भारतानेही नकार दिला आहे. याउलट, भारत, अर्जेंटिना, ब्राझील आणि युक्रेनकडून सोयाबिन, सोया तेल आणि कृषी उत्पादनांची आयात करत आहे. त्यामुळे, अमेरिकन शेतकऱ्यांच्या मालाला जागतिक बाजारात खरेदीदार सापडत नाही.
भारतीय वकील आणि लेखक नवरूप सिंह यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, 'भारत आणि चीन यांनी अमेरिकन सोयाबिन खरेदी न करण्याचा निर्णय कायम ठेवला, तर कोणीही अमेरिकन मका आणि सोयाबिन खरेदी करणार नाही. जर ट्रम्प यांनी सातत्याने टॅरिफ वाढवत राहिले तर इतर उत्पादनांसाठीही खरेदीदार मिळणे कठीण होईल'.
यादरम्यान, अमेरिकेतील सिनेट नेते जॉन थुन यांनीही मान्य केले आहे की, 'टॅरिफच्या निर्णयाचा फटका आता थेट अमेरिकेलाच बसत आहे. महागाई वाढली असून निर्यात घटली आहे. चीनने अमेरिकेवर प्रतिउत्तर 34 टक्के टॅरिफ लावला आहे. यासह, अमेरिकेविरुद्ध आता ब्राझील, भारत आणि रशियानेही कठोर भूमिका घेतली आहे'.