अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा दावा समोर आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चांना उधाण आले आहे. काही वृत्तांनुसार, इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेने अमेरिकेला अशी माहिती दिल्याचा दावा केला आहे की, इराणकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा कट रचला जात असल्याची शक्यता आहे. या वृत्तामुळे जागतिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे.
आंतरराष्ट्रीय माध्यमांतील वृत्तांनुसार, इस्रायलने अमेरिकन अधिकाऱ्यांना संभाव्य सुरक्षाधोक्याबाबत अलर्ट केले आहे. या माहितीमध्ये ट्रम्प यांच्याविरोधात विशेष नियोजन सुरू असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दाव्याला अमेरिकेच्या अधिकृत गुप्तचर यंत्रणांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही.
इराण आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावपूर्ण राहिले आहेत. 2020 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डच्या कुद्स फोर्सचे प्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला.
डोनाल्ड ट्रम्प यांनीही काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना इराणच्या कथित 'हिटलिस्ट'मध्ये आपले नाव सर्वात वर असल्याचा दावा केला होता. इराणकडून आपल्याला लक्ष्य केले जाऊ शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, या विधानांबाबत कोणतेही अधिकृत पुरावे सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत.
दरम्यान, काही अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, इस्रायलने दिलेल्या या माहितीमागे इराणविरोधातील अमेरिकेची भूमिका आणखी कठोर व्हावी, असा राजनैतिक हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दाव्यांकडे सावधगिरीने पाहण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.
दुसरीकडे, अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. अलीकडील संघर्षानंतर दोन्ही देशांमधील थेट संवाद जवळपास थांबला असल्याचे संकेत आहेत. ट्रम्प यांनीही इराणशी सध्या कोणतीही चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, पडद्यामागे अणुकरारासंदर्भात काही राजनैतिक हालचाली सुरू असल्याचे अमेरिकन सूत्रांकडून सांगितले जात आहे.
ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत संभाव्य करारासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत असली, तरी दोन्ही देशांतील वाढता अविश्वास आणि सुरक्षा विषयक दावे यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली आहे.