अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इराणविरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांनंतर अमेरिकेतील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली असून 25व्या घटनादुरुस्तीअंतर्गत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या संदर्भात अमेरिकेतील किमान पाच खासदारांनी ट्रम्प यांना पदावरून हटवण्यासाठी कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या मते, ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडण्यात अक्षम ठरत आहेत. त्यामुळे देशहितासाठी त्यांना पदावरून कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या संसदेमधील प्रतिनिधी बेका बालिंट यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “जर बराक ओबामा किंवा जो बायडेन यांनी असे वक्तव्य केले असते, तर रिपब्लिकन पक्षाने त्यांना पदावरून कमी करण्याची मागणी केली असती.”
त्याचप्रमाणे, सिनेटर क्रिस मर्फी यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, “जर मी ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये असतो, तर 25व्या दुरुस्तीचा वापर करण्यासाठी तात्काळ कायदेशीर सल्ला घेतला असता.” अमेरिकन काँग्रेस सदस्य यास्मीन अन्सारी यांनीही ट्रम्प यांच्यावर कठोर टीका करत त्यांना हटवण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा: वयाच्या 42 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री होणार आई, सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली गुड न्यूज
दरम्यान, प्रतिनिधी मेलानी स्टान्सबेरी यांनीही परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत “आता कारवाई केली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल,” असा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडींमुळे अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली आहे.
25वी घटनादुरुस्ती म्हणजे काय?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांना पदावरून हटवण्याबाबत 25 व्या घटनादुरुस्ती कायद्या अंतर्गत तरतूद आहे. राष्ट्राध्यक्ष अचानक असमर्थ झाल्यास किंवा कार्य करण्यास अयोग्य ठरल्यास उपराष्ट्राध्यक्ष तात्पुरते किंवा उर्वरित कार्यकाळासाठी पदभार स्वीकारू शकतात.
या प्रक्रियेसाठी प्रथम राष्ट्राध्यक्षांच्या मंत्रिमंडळाने प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक असते. राष्ट्राध्यक्षांनी विरोध केल्यास हा मुद्दा तेथील काँग्रेसमध्ये जातो. तेथे दोन्ही सभागृहांमध्ये दोन-तृतीयांश बहुमताने प्रस्ताव मंजूर झाल्यास राष्ट्राध्यक्षांना पद सोडावे लागते. दरम्यान, काही वृत्तांनुसार ट्रम्प यांनी वादग्रस्त वक्तव्यांनंतर काही दिवसांची विश्रांती घेतली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे अमेरिकेतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील काही दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.