हवाई वाहतूक अधिकारी आणि स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, डॉमिनिकन रिपब्लिकमधील एका विमानतळावर परतण्याचा प्रयत्न करत असताना अमेरिकेत नोंदणीकृत एक खासगी जेट विमान कोसळले असून, त्यात विमानातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. डॉमिनिकन हवाई वाहतूक प्राधिकरणाने N318JF या अमेरिकन नोंदणी क्रमांकाचे GALX बिझनेस जेट म्हणून ओळखलेले हे विमान, रविवारी देशाच्या आग्नेय भागातील ला रोमाना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ कोसळले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे जेट ऑस्टिन, टेक्सासकडे जात होते. परंतु ला रोमानाच्या नैऋत्येस सुमारे 16 नॉटिकल मैल अंतरावर आपत्कालीन स्थिती जाहीर करून ते विमानतळाकडे परत फिरले. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये विमान धावपट्टीच्या बाजूच्या गवतावरून घसरत असल्याचे दिसत होते आणि ते पुढे सरकत असताना त्याचे तुकडे वेगळे होत होते. काही क्षणांनंतर, विमानाच्या मागील भागाला आग लागली. त्यानंतर एक मोठा स्फोट झाला आणि दाट काळा धूर पसरला.
डोमिनिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे विमान अमेरिकेत नोंदणीकृत होते आणि एका एक्झिक्युटिव्ह एव्हिएशन कंपनीच्या नावे सूचीबद्ध होते. अपघाताच्या वेळी विमानात फक्त पायलट आणि को-पायलट होते आणि इतर कोणीही प्रवासी नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी विमानाला अडचणी आल्या. आपत्कालीन लँडिंगच्या प्रयत्नादरम्यान ते कोसळले. ज्यामुळे आपत्कालीन सेवांना पाचारण करण्यात आले. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये विमानतळावर धुराचा मोठा लोट दिसत होता, तर आग विझवण्यासाठी पाण्याच्या टँकरमधून पाण्याचा फवारा मारला जात होता. नागरी विमान वाहतूक मंडळाचे संचालक, हेक्टर पोर्सेला यांनी एएफपीला सांगितले की, त्यांना अद्याप अपघाताचा तपशील माहित नाही.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन्ही क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. त्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. डोमिनिकन नागरी विमान वाहतूक संस्था आणि देशाच्या विमान अपघात तपास आयोगाने सांगितले की, अपघातानंतर आपत्कालीन प्रक्रिया सक्रिय करण्यात आली होती. अपघाताचे कारण निश्चित करण्याचे काम आता तपास करत आहेत.