गोकुळ विरोधी गटातील संचालिका शौमिका महाडिक यांनी ‘गोकुळ’च्या कारभाराचा भांडाफोड करण्याचा इशारा दिला होता. यानंतर लगेचच गोकुळचे सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षणाची करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर पत्रकाराने विचारणा केल्यानंतर सतेज पाटील यांनी गोकुळच्या मागील वर्षांच्या आर्थिक चौकशीची मागणी केल्याने पाटील – महाडिक वाद रंगण्याची चिन्हे आहेत.
गोकुळचे केवळ दोन वर्षांचे कशाला, २५ वर्षांचे लेखापरीक्षण करा, अशी मागणी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी केली. महाविकास आघाडीचे सरकार असताना काँग्रेसचेच सुनील केदार दुग्धविकास मंत्री होते. आम्ही ठरवले असते तर गोकुळसोबतच राजाराम कारखान्यावर प्रशासक आणू शकलो असतो. आम्ही सत्तेचा वापर करून कुणावर सूडबुद्धीने कारवाई केली नाही, असे सतेज पाटील म्हणाले. गोकुळमध्ये यापूर्वी अनेक वर्षे माजी आमदार महादेव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. २०२१ मध्ये आमदार पाटील आणि माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सत्तांतर केले. यामध्ये विरोधी आघाडीतून शौमिका महाडिक संचालिका झाल्या.
गोकुळच्या वार्षिक सभेनंतर चार महिने मी शांत होते. संघात चाललेल्या गैरकारभाराचे पुरावे जमवत होते. त्याचे फळ लवकरच समोर येईल, असे शौमिका महाडिक यांनी समाज माध्यमातून सांगितले. त्यानंतर लेखा परीक्षणाचा आदेश आला. यामुळे याला राजकीय वास येत आहे.
या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार पाटील यांनी गोकुळच्या २५ वर्षापासूनच्या लेखा परीक्षणाची मागणी करीत मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.