दिल्लीच्या करोल बाग परिसरात मंगळवारी दिनांक 24 मार्च 2026 रोजी मध्यरात्रीनंतर भीषण रस्ते अपघात घडला आणि काही क्षणांतच परिसरात भीतीचे सावट पसरले. झंडेवाला हनुमान मंदिराजवळ प्रवाशांनी भरलेली डबल डेकर बस अचानक नियंत्रण सुटून पलटली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची बातमी समजताच पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, रात्री सुमारे 1 वाजून 8 मिनिटांनी बस पलटल्याची सूचना मिळाली. राजस्थानहून दिल्लीकडे येत असलेली ही बस झंडेवाला हनुमान मंदिर चौकाजवळ, मेट्रो मार्गाखालील वळणावर अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि क्षणार्धात पलटी झाली. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 25 प्रवासी प्रवास करत होते.
बस उलटताच परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रवाशांच्या आर्त किंकाळ्यांनी वातावरण हादरून गेले. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत पोलिसांसोबत बचावकार्याला हातभार लावला. घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने मोठ्या क्रेनच्या मदतीने बस सरळ केली आणि तिच्या खाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.
#WATCH | Delhi: Visuals from the spot where a bus lost control and overturned last night near the Jhandewalan Temple in Delhi's Karol Bagh area. https://t.co/hIumV2PglV pic.twitter.com/7U8YTqFA6o — ANI (@ANI) March 25, 2026
प्राथमिक तपासात अपघाताचे प्रमुख कारण बसचा वेग असल्याचे समोर येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, बस अतिवेगात होती आणि वळणावर चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे बस घसरत जाऊन रस्त्यावर पलटी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अपघातातील सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मृतांच्या पार्थिवांना शवविच्छेदनासाठी शवागारात पाठवण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळविण्यात आले आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. अपघातामागे तांत्रिक बिघाड होता की चालकाची निष्काळजीपणा कारणीभूत ठरला, याचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. रात्री रस्ते मोकळे असल्याने अनेकदा चालक वेग वाढवतात, परंतु हीच बेफिकीरी जीवावर बेतू शकते, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.