आजच्या डिजिटल युगात प्रत्येक क्षेत्र ई-कॉमर्स, बँकिंग किंवा सोशल मीडिया डेटावरच अवलंबून आहे. याच पार्श्वभूमीवर ‘डेटा सायन्स’ ही क्षेत्र झपाट्याने पुढे येत असून, डेटा सायंटिस्ट ही भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. साध्या भाषेत सांगायचे झाले तर, डेटा सायंटिस्ट म्हणजे मोठ्या प्रमाणातील डेटाचा अभ्यास करून त्यातून उपयुक्त निष्कर्ष काढणारा आणि भविष्यातील निर्णयांसाठी दिशा देणारा तज्ज्ञ.
यामुळेच खासगी क्षेत्रात डेटा सायंटिस्टची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक कंपनीला त्यांच्या डेटाचे विश्लेषण करून योग्य रणनीती ठरवणारा तज्ञ हवा असतो. भविष्यातही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
शैक्षणिक पात्रता
डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी शैक्षणिक पाया मजबूत असणे गरजेचे आहे. बारावीनंतर गणित किंवा विज्ञान शाखा घेतल्यास या क्षेत्रात प्रवेश करणे सोपे जाते. त्यानंतर बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स), बीएससी (सांख्यिकी, गणित किंवा डेटा सायन्स) यांसारखे अभ्यासक्रम करता येतात. पुढे एमएससी डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा कोर्सही उपयुक्त ठरतात. याशिवाय उद्योग क्षेत्रातील नामांकित प्रमाणपत्र अभ्यासक्रमही करिअरसाठी फायदेशीर ठरतात.
आवश्यक कौशल्ये
या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या कौशल्यांची गरज असते. प्रोग्रामिंग भाषा जसे Python किंवा R यांचे ज्ञान आवश्यक आहे. त्याचबरोबर सांख्यिकी आणि गणिताची भक्कम समज असणे गरजेचे आहे. मशीन लर्निंग, डेटा व्हिज्युअलायझेशन (Tableau, Power BI) आणि SQL यांसारख्या तांत्रिक कौशल्यांवर प्रभुत्व मिळवणे महत्त्वाचे ठरते. तसेच समस्या सोडवण्याची क्षमता आणि विश्लेषणात्मक विचारसरणीही तितकीच आवश्यक आहे.
करिअरच्या संधी
करिअरची सुरुवात करताना लहान प्रकल्पांवर काम करणे अत्यंत फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ, एखाद्या वेबसाइटचा डेटा विश्लेषण करणे किंवा प्रेडिक्शन मॉडेल तयार करणे. अशा प्रकल्पांमुळे मजबूत पोर्टफोलिओ तयार होतो, जो नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतो.
एकूणच, डेटा सायन्स हे भविष्यातील अत्यंत आशादायक क्षेत्र मानले जाते. या क्षेत्रात करिअर केल्यास उत्तम पगारासोबतच प्रगतीचीही मोठी संधी मिळते. पुढे जाऊन सीनियर डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग इंजिनिअर किंवा एआय तज्ज्ञ अशा उच्च पदांपर्यंत पोहोचण्याची संधीही उपलब्ध होते.
हेही वाचा: Ashok Kharat Case: भोंदू खरातचे 32 बेनामी बँक व्यवहार उघड; 'या' पतसंस्थेच्या मॅनेजरला अटक