कोरोनाची वाढती रुग्णसंख्येमुळे राज्यात सर्वत्र टाळे बंदी करण्यात आली होती. त्यामुळे निर्बंधाच्या अधीन राहून नागरिकांनी गेल्या वर्षीची दिवाळी घरीच साजरी केली. मात्र आता राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे यंदाची दिवाळी नागरिक प्रचंड उत्साहात साजरी करणार आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेंमध्ये गर्दी केल्याचे चित्र दिसून आले आहेत.
दिवळीच्या पार्श्वभूमीवर अमरावती बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. बाजारपेठेंमध्ये ग्राहकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे अमरावती महानगरपालिका प्रशासनाने कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी कोरोना नियम पाळून लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.
दिवाळी निमित्त खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी अमरावती शहरात होत आहे. याच गर्दीचा फायदा घेत बाजारपेठेंमध्ये चोरटे सक्रीय झाले आहेत. त्यामुळे महिलांनी दागिने, पैसे, मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवण्याचे आवाहन अमरावती पोलीस आयुक्त आरती सिहं यानी केले आहे.
नाशिकमध्येही बाजारपेठेंमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे. दिवाळी सणासाठी आवश्यक पणत्या, कंदील, रांगोळीच्या खरेदीसाठी नाशिककरांची झुंबड उडाली आहे. राज्यातील कोरोनावरील निर्बंध हटवल्यामुळे नाशिक बाजारपेठेंमध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहे. तसेच व्यापारी वर्गामध्येही आनंदाचे वातावरण आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेंमध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यामुळे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली आहे. तसेच अनेक महिन्यांनंतर बाजारात उलाढाल झाल्याने व्यापारी वर्गात आनंतदाचे वातावरण आहे. – राजेंद्र बागुल, व्यापारी (नाशिक)