चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढल्यामुळे काही भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच आता, कोरोनाचा नवा व्हेरिएंट बीए.२ने जगभराची चिंता वाढवली आहे. तर या विषाणूमुळे जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच बीए.२ हा व्हेरिएंट धोकादायक असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
जगभरात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. काही देशांनी कोरोना चाचण्या करण्याचे प्रमाण कमी केले आहे. मात्र, तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या हे ‘हिमनगाचे टोक’ असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयसस म्हटले आहेत.
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यातच आता दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचे दिसत आहे. दक्षिण कोरियामध्ये एकाच दिवसात ४ लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच या रुग्णांमध्ये ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या देशात बुधवारी ४,००,०७१ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यानंतर एकाच दिवसात झालेली ही मोठी वाढ आहे.