विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधीमंडळात मविआ सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या व्यवस्थापनात घोटाळेच घोटाळे झाले असल्याची टीका फडणवीसांनी राज्य सरकारवर केली आहे. तसेच मुंबई मेली तरी चालेल, पण यांचे घर भरणे सुरू आहे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.
फडणवीस म्हणाले, कोरोना व्यवस्थापनात अनेक घोटाळे झाले आहेत. कोरोना कंत्राटाच्या आडून स्वकीयांवर मेहेरनजर केली असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. तसेच कोविड सेंटर कंत्राट प्रकरणी बेबंदशाही केली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोरोना काळात ऑक्सिजन पुरवठ्याचे काम काळ्या यादीतील कंपनीला दिले असून ऑक्सिजन पुरवठी कामातही मलिका खाल्ला असल्याचे फडणवीस म्हणाले. कंत्राट दिलेल्या कंपनीकडे स्वत:चा जीएसटी क्रमांक नाही. तसेच वजन पडल्याशिवाय पालिकेत फील हलतच नव्हत्या, असेही फडणवीस म्हणाले.
कुठल्याही टेंडरविना कंत्राट मुंबई पालिकेने काढले असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच पाच कोविड सेंटरचे १०० कोटींचे काम नातेवाईकांनाच देण्यात आले. तर त्यांना अतिरिक्त ३८ कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे मुंबईला काहीही न देण्याऐवजी लुटण्याचे काम सुरू असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. मुंबई महापालिकेत अनेक घोटाळे झाले आहेत. त्यामुळे मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरलं पाहिजे, अशी वृत्ती राज्य सरकारची झाली आहे. आणि यावर आम्ही काही बोललो तर आम्ही मुंबई मराठी माणसाचे शत्रू ठरतो, असेही फडणवीस म्हणाले.