विक्रांत बचाव मोहिमप्रकरणी भाजप नेते किरीट सोमैया आणि त्यांचा मुलगा नील सोमैया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमैया पितापुत्रांना पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. सोमैयांना १४ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा दिलेला आहे.
किरीट सोमैयांना आर्थिक गुन्हे विभागाकडून समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार सोमैयांची १८ एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशी करण्यात आली. त्यानुसार आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून पुढील सुनावणीपर्यंत सोमैया पितापुत्रांना अटक करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले आहेत. तसेच सोमैया पितापुत्रांना १४ जूनपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा कायम आहे.
यावर, किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून आम्ही चौकशीत सहकार्य करू’, असे सोमैया म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेता किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटी रुपयांची रक्कम लाटली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊतांनी आरोप केला की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम झाली होती. पण ही रक्कम राज्यपाल कार्यालयात पोहचले नसल्याचे समोर आले आहे. सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटलेली रक्कम २०१४च्या निवडणूकीसाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला आहे. हा घोटाळा म्हणजे किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे.