WiFi Connection Tips: आजच्या काळात इंटरनेट हा दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. घरात पाहुणे आले किंवा ऑफिसमध्ये सहकारी असतील, तर Wi-Fi पासवर्ड शेअर करणे नेहमीच त्रासदायक ठरते. अनेकदा पासवर्ड मोठा, अवघड असतो किंवा सुरक्षेच्या दृष्टीने तो सगळ्यांना सांगायची इच्छा नसते. अशावेळी पासवर्ड न टाकता Wi-Fi कनेक्ट करण्याच्या काही सोप्या आणि सुरक्षित पद्धती फोनमध्ये उपलब्ध आहेत.
अँड्रॉइड फोनमध्ये QR कोडद्वारे Wi-Fi शेअर करण्याचा पर्याय दिला जातो. इंटरनेट जोडलेल्या Wi-Fi नेटवर्कवर टॅप केल्यानंतर ‘शेअर’ हा पर्याय मिळतो आणि त्यावर क्लिक केल्यावर स्क्रीनवर QR कोड दिसतो. दुसऱ्या व्यक्तीने हा कोड फोनच्या कॅमेऱ्याद्वारे स्कॅन केला की त्याचा मोबाइल Wi-Fi शी थेट कनेक्ट होतो. या प्रक्रियेत पासवर्ड दिसत नसल्यामुळे ही पद्धत सुरक्षित मानली जाते.
iPhone वापरकर्त्यांसाठीही पासवर्ड न दाखवता नेटवर्क शेअर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. दोन्ही iPhone जवळ असताना आणि त्यामध्ये Wi-Fi व Bluetooth सुरू असेल, तर दुसऱ्या व्यक्तीने उपलब्ध नेटवर्क सिलेक्ट केल्यानंतर ‘Share Password’ असा पर्याय दिसतो. फक्त एक टॅप केल्यानंतर कनेक्शन झटक्यात तयार होते.
काही जुने स्मार्टफोन्स असतील किंवा Wi-Fi शेअर पर्याय नसेल, तर QR कोड स्वतः तयार करण्याचीही पद्धत आहे. यासाठी काही वेबसाइट्स आणि अॅप्सचा वापर करून Wi-Fi नाव आणि पासवर्ड टाकल्यावर QR कोड बनवता येतो. हा कोड फोनमध्ये सेव्ह करून ठेवला तर पाहुणे कोड स्कॅन करून थेट नेटवर्क वापरू शकतात.
अनेक राउटर्समध्ये ‘Guest Network’ ची सुविधा असते. त्याद्वारे पाहुण्यांसाठी वेगळे नेटवर्क तयार करता येते. मुख्य नेटवर्कची सुरक्षा कायम राहते आणि पाहुण्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय इंटरनेटचा वापर करता येतो.
तज्ज्ञांच्या मते, QR कोड किंवा Wi-Fi शेअरिंग फीचर वापरल्यास पासवर्ड शेअर करण्याची गरज राहत नाही. तसेच चुकीच्या व्यक्तीकडे पासवर्ड पोहोचण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे घर आणि ऑफिसमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना इंटरनेट देताना या सुविधा उपयोगी ठरू शकतात.