दिल्ली विमानतळावर एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. दिल्ली विमानतळावर अकासा एअर आणि स्पाइसजेटच्या विमानांमध्ये ग्राउंड टक्कर झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पाइसजेटचं बोईंग 737-700 विमान टॅक्सिंग करत असताना अकासा एअरच्या विमानाला धडकलं. अकासा एअरचे VT-YBA विमान हैदराबादकडे पुशबॅक घेत असताना लेहमधून आलेले स्पाइसजेटचे VT-SLB विमान गेटकडे जात होते.
यावेळी दोन विमानांच्या पंखांची टक्कर झाली, यामध्ये स्पाईस जेटच्या विमानाचं नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला असून सर्व प्रवाशांना विमानातून सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. यावेळी दोन्ही विमानाचा वेग कमी असल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. घटनेच्या तत्काळ माहितीनंतर विमानतळ प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी स्पाइसजेटच्या उजव्या विंगलेटचं मोठं नुकसान झालं, असून अकासा एअरच्या विमानाचा डावा हॉरिझॉन्टल स्टॅबिलायझर खराब झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्पाईसजेटच्या विमानाने धडक दिली तेव्हा अकासाचे विमान स्थिर होते. त्यामुळे यात नेमकी कोणाची चूक आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या अपघातानंतर अकासा एअरचं दिल्ली-हैदराबाद विमान QP 1406 ही उड्डाणापूर्वीचं रद्द करण्यात आलं आहे.
3 फेब्रुवारी रोजी अशीच एक घटना इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानाबाबत घडली होती. हैदराबादहून मुंबईला जाणारे इंडिगोचे विमान 6E 791 आणि मुंबईहून कोईम्बतूरला जाणारे एअर इंडियाचे विमान AI 2732 या दोन विमानांच्या पंखांचा स्पर्श एकामेकाला झाला होता. यावेळी इंडिगोचे विमान उतरले होते आणि पुशबॅक करत होते, तर एअर इंडियाचे विमान उड्डाणापूर्वी टॅक्सीवेवर थांबले होते.