Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टी पुन्हा चर्चेत; अकाऊंट परत मिळाल्यानंतर अभिजीत दीपकेचा मोठा दावा, ‘भारतीय तरुणांना पाकिस्तानी…’

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू झाल्यानंतर फॉलोअर्सची माहिती शेअर करत 94 टक्के फॉलोअर्स भारतीय असल्याचा दावा केला आहे

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टी पुन्हा चर्चेत; अकाऊंट परत मिळाल्यानंतर अभिजीत दीपकेचा मोठा दावा, ‘भारतीय तरुणांना पाकिस्तानी…’

सोशल मीडियावर काही दिवसांतच प्रचंड चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पक्ष’ या व्यंगात्मक मोहिमेचे संस्थापक अभिजीत दीपके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बंद पडलेले किंवा हॅक झाल्याचा दावा करण्यात आलेले इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू झाल्यानंतर अभिजीतने सोशल मीडियावर नवा व्हिडिओ शेअर करत जोरदार पुनरागमनाची घोषणा केली आहे. “आम्ही परत आलो आहोत” असा संदेश देत त्यांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवले आहे.

अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’वर त्यांच्या फॉलोअर्सची माहिती सार्वजनिक केली. त्यानुसार, कॉकरोच जनता पक्षाच्या सोशल मीडिया पेजवरील 94 टक्क्यांहून अधिक फॉलोअर्स भारतातील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वी किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काही लोक पाकिस्तान आणि जॉर्ज सोरोसशी संबंधित गटांच्या मदतीने फॉलोअर्स वाढवत असल्याचा आरोप केला होता. जरी त्यांनी कोणाचे नाव घेतले नव्हते, तरी त्यानंतर सोशल मीडियावर कॉकरोच जनता पक्षाबाबत चर्चा सुरू झाली होती. आता अभिजीतने “जेव्हा आमचे बहुतांश फॉलोअर्स भारतीय आहेत, मग भारतीय तरुणांना पाकिस्तानी का म्हटलं जातंय?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, कॉकरोच जनता पक्षाची वेबसाइट अद्याप बंद असल्याचे समोर आले आहे. अभिजीतने दावा केला की या वेबसाइटवर तब्बल दहा लाख लोकांनी नोंदणी केली होती. तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन याचिकेवर सहा लाख लोकांनी स्वाक्षऱ्या केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अकाउंट हॅक झाल्याच्या चर्चांदरम्यानही या पेजची लोकप्रियता कमी झालेली नाही. उलट, कॉकरोच जनता पक्षाच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या 22.9 दशलक्षांवर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या मोहिमेची ताकद अधिक स्पष्ट होत आहे.

अभिजीत दीपके हे संभाजीनगरचे रहिवासी असून त्यांनी पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात पब्लिक रिलेशन्स विषयात उच्च शिक्षण घेत आहेत. यापूर्वी त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षासाठी सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनही काम केले होते.

राजकीय व्यंग, मीम्स आणि सोशल मीडिया मोहिमांच्या माध्यमातून तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या अभिजीतच्या या नव्या प्लॅटफॉर्ममुळे सोशल मीडिया आणि राजकारण यांच्यातील संबंधांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः तरुण वर्गाचा प्रतिसाद पाहता आगामी काळात हा विषय आणखी गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number