दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या संसद मार्चदरम्यान रविवारी मोठा तणाव निर्माण झाला. आंदोलक संसद भवन परिसरापर्यंत पोहोचल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ बंदोबस्त वाढवत संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला, तर संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.
आंदोलकांनी संसद भवनाच्या दिशेने कूच करताच प्रशासनाने आधीच उभारलेले बॅरिकेड्स आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. सध्या आंदोलक रेल्वे भवनाजवळ धरणे आंदोलन करत असून परिसरात तणावपूर्ण वातावरण कायम आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. संसद भवनात झालेल्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आंदोलनाची तीव्रता आणि पुढील परिस्थिती यावर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, सरकारनेही आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कॉकरोच जनता पार्टीतर्फे आशुतोष रांका आणि सौरभ दास हे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. सकाळीच चर्चेसाठी सरकारकडून संपर्क झाल्याचा दावा पक्षाने केला आहे.
यापूर्वी जंतर-मंतरवरून संसदेकडे निघालेल्या मोर्चाला रोखताना पोलिसांनी लाठीचार्जही केला होता. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने दिल्ली पोलिसांनी राजधानीत सुरक्षा व्यवस्था आधीपासूनच कडक केली होती. नवी दिल्ली परिसरात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १६३ लागू करण्यात आले होते.
या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, संजय सिंह, आजाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर, अभिनेते प्रकाश राज तसेच सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावली. त्यामुळे या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले असून पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.