बीजिंग: जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या चीनच्या हाती आता सोन्याचे अवाढव्य घबाड लागले आहे. चीनच्या शानडोंग प्रांतातील यांताय शहराच्या लाइझोउ किनाऱ्याजवळ समुद्राखाली सोन्याचा प्रचंड साठा शोधण्यात भूगर्भशास्त्रज्ञांना मोठे यश आले आहे.
आशिया खंडातील समुद्राखालील साठ्यांच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शोध मानला जात असून, यामुळे जागतिक सुवर्ण बाजारात मोठी खळबळ माजली आहे. या नव्या शोधामुळे एकट्या लाइझोउ भागातील एकूण प्रमाणित सोन्याचा साठा आता 3900 टनांच्या पार गेला असून, हे प्रमाण चीनच्या एकूण राष्ट्रीय साठ्याच्या तब्बल 26 टक्के इतके प्रचंड आहे.
चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून एकापाठोपाठ एक सोन्याचे मोठे साठे सापडत आहेत. यापूर्वी लियाओनिंग प्रांतात 1444 टन आणि कुनलून पर्वतरांगांमध्ये 1000 टनांहून अधिक सोन्याचा शोध लागला होता. मात्र, जिआओडोंग द्वीपकल्पावरील हा नवा शोध चीनसाठी खऱ्या अर्थाने 'जॅकपॉट' ठरला आहे.
जिआओडोंग द्वीपकल्प हा आधीच जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोन्याचा खाणपट्टा म्हणून ओळखला जातो. या भौगोलिक रचनेमुळे शेकडो किलोमीटर लांब पसरलेल्या भूभ्रंशरेषांमधील क्वार्ट्झ शिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने साठले आहे.
या ऐतिहासिक यशामागे चीनचे प्रगत तंत्रज्ञान आणि दशकानुदशकांचे नियोजन कारणीभूत आहे. चिनी शास्त्रज्ञ आता खनिज अन्वेषणासाठी Artificial Intelligence (AI), उच्च क्षमतेचे Ground-Penetrating Radar आणि अत्याधुनिक उपग्रहांचा वापर करत आहेत. टेक्टॉनिक प्लेट्सच्या धडकेमुळे पृथ्वीच्या खोलवर निर्माण झालेल्या भेगांतून गरम खनिजद्रव वर आला आणि त्यातूनच हे मौल्यवान साठे तयार झाले आहेत. पूर्वी जे साठे 'Low-grade' मानून दुर्लक्षित केले जात होते, ते आता प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू लागले आहेत.
चलनातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक जोखमींपासून संरक्षण (Hedge) म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. त्याचबरोबर Electronics आणि Aerospace उद्योगांसाठीही सोने अत्यंत महत्त्वाचे आहे. जरी चीन सध्या प्रमाणित साठ्यांच्या बाबतीत रशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या मागे असला, तरी या नव्या शोधामुळे चीनची ताकद कैक पटींनी वाढली आहे.
1950 च्या दशकापासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चीन आता जागतिक सुवर्ण उत्पादनात आणि साठ्यात आपली हुकूमत गाजवण्यास सज्ज झाला आहे.