आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी प्रमुख चंदा कोचर आणि न्यूपॉवर कंपनीचे संस्थापक दीपक कोचर यांच्यावर सीबीआयने कारवाई केली आहे. व्हिडीओकॉन समूहाच्या कर्ज प्रकरणी सीबीआयने चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्यावर कारवाई केली आहे.
खासगी क्षेत्रातील बँकेचे प्रमुख असताना व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जामध्ये अनियमितता केल्याच्या आरोप करत याप्रकरणी चौकशी करण्यासाठी चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे. दरम्यान, कोचर दाम्पत्याच्या अटकेमुळे बॅंक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
२०१२मध्ये व्हिडिओकॉन समुहाला आयसीआयसीआय बँकेकडून ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. त्यानंतर या कंपनीचे प्रवर्कत वेणूगोपाल धूत यांनी न्यूपॉवर कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. याप्रकरणात अनेक गुन्हेगारी कट रचून खाजगी कंपन्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. तर, यातून आयसीआयसीआय बँकेची फसवणूक झाली असल्याचे सीबीआयने म्हटले होते. याप्रकरणी २०१९मध्ये सीबीआयने तक्रार दाखल केली होती.
न्यूपॉवर कंपनी दीपक कोचर यांची असून संबंधित व्यवहारातून कोचर दाम्पत्याला मोठ्या प्रमाणात लाभ झाला. दरम्यान, चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवार करून बेकायदेशीररित्या व्हिडिओकॉन समूहाला कर्ज मंजूर केले असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. त्यामुळे, याप्रकरणी व्हिडिओकॉन समुहाला दिलेल्या कर्जामध्ये केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी कोचर दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.