चमोली (उत्तराखंड): उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक मोठा अपघात घडला. पीपलकोटी येथील Tehri Hydro Development Corporation (THDC) च्या विष्णुगड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात (Tunnel) मजुरांना नेणाऱ्या दोन लोको ट्रेन एकमेकांवर आदळल्या. या भीषण धडकेत 70 मजूर जखमी झाले असून, अपघाताच्या वेळी दोन्ही ट्रेनमध्ये मिळून सुमारे 108 कामगार प्रवास करत होते.
हा अपघात मंगळवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडला. त्यावेळी मजुरांची शिफ्ट बदलण्याची प्रक्रिया सुरू होती. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाडामुळे मागून येणाऱ्या एका ट्रेनने पुढील ट्रेनला जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. बोगद्याच्या अंधार असणाऱ्या भागात ही धडक झाल्याने अनेक मजूर तोल जाऊन ट्रेनच्या आतच कोसळले. क्षणातच त्या ठिकाणी गोंधळ, आरडाओरड आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताची माहिती मिळताच प्रकल्प व्यवस्थापन, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमी मजुरांना तात्काळ अॅम्ब्युलन्स आणि इतर वाहनांद्वारे गोपेश्वर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, बहुतांश मजुरांना किरकोळ दुखापती झाल्या असून काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना विशेष निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
#WATCH | Chamoli, Uttarakhand | Several workers injured after internal transport trains operating within the THDC hydropower project area at Pipalkoti, collided with each other. As per Chamoli DM and SP, 109 people were onboard the trains, out of whom 60 were injured. Visuals… pic.twitter.com/lBkCUY8Plp — ANI (@ANI) December 31, 2025
सध्या 42 जखमी मजुरांवर गोपेश्वर जिल्हा रुग्णालयात, तर 17 मजुरांवर पीपलकोटी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी गौरव कुमार आणि पोलीस अधीक्षक सुरजीत सिंह पंवार यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि डॉक्टरांना योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले.
जखमी मजुरांपैकी बहुतांश कामगार झारखंड आणि ओडिशा राज्यातील असल्याची माहिती आहे. त्यांच्या कुटुंबीयांना अपघाताबाबत कळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी सुरू असून, सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.