बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने तिच्या पतीवर मुंबईतील न्यायालयात घरगुती हिंसाचाराचा आरोप करत खटला दाखल केला आहे. अभिनेत्री सेलिना जेटली आणि तिचे पती ऑस्ट्रियन हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजक पीटर हाग यांच्या लग्नाला 14 वर्ष पुर्ण झाली असून तिने पतीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. सेलिनाच्या याचिकेनंतर, मुंबई न्यायालयाने पीटर हाग यांना औपचारिक नोटीस बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सेलिना जेटलीने तिचा पती पीटर हाग याच्यावर घरगुती हिंसाचार, क्रूरता आणि छेडछाडीचा आरोप करत, मासिक 10 लाख रुपये पोटगी आणि 50 कोटी आणि इतर आर्थिक नुकसानभरपाईची मागणी केली आहे. याउलट तिने असा दावा केला आहे की, तिच्या पतीने तिला तिच्या उत्पन्नाचा स्रोत गमावण्यास आणि तिच्या मालमत्तेचे नुकसान करण्यास भाग पाडले आहे.
तसेच तिने तिचा पती पीटर हागला तिच्या मुंबईतील घरात प्रवेश करण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे आणि तिच्या तीन मुलांचा ताबा – विन्स्टन, विराज आणि आर्थरची मागणी केली आहे. सेलिना जेटली आणि पीटर हाग हे दोघेही 2011 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यानंतर तिला मार्च 2012 मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. दुर्दैवाने त्यातील एक मुल 2017 मध्ये आजारपणामुळे गेलं.
सेलिना जेटलीने 2003 मध्ये 'जानिशें' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती 'अपना सपना मनी मनी', 'नो एंट्री', 'गोलमाल रिटर्न्स', 'जवानी दिवानी', 'थँक यू', 'रेड', 'खेल', 'सलाखें' आणि 'जिंदा' यासारख्या चित्रपटांमध्ये वारंवार चाहत्यांच्या मनावर राज्य करु लागली. मात्र त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली.