साताऱ्यातील वाई पाचगणी रस्त्यावर दांडेघर गावानजीक चालत्या कारने पेट घेतल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली आहे. घटनेची माहिती समजताच पाचगणी पोलीस घटनास्थळी पोहचले. शॉर्टसर्किटने कारने पेट घेतला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पनवेल येथील ओंकार कृष्णा बसवंत व सुचिता कृष्णा बसवंत हे भाऊ- बहीण गाडी मधून गुरुवारी पाचगणी महाबळेश्वरला फिरायला निघाले होते. वाईहून पाचगणीला जात असताना दुपारी अडीचच्या सुमारास पसरणी घाटातील दत्त मंदिराच्या अलीकडे गाडीतून धूर येऊ लागल्याने चालक ओंकारने गाडी बाजूला घेतली. तेव्हा लगेच चालकाला नेमकं काय घडलंय हे समजलं. घडला प्रकार समजताच गाडीत बसलेली भावंडं देखील लगेच खाली उतरली. त्यानंतर बोनेट उघडले असता गाडीने पेट घेतला. हळूहळू आग पसरली आणि गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पाचगणी पालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. दरम्यानच्या काळात घाटात वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही काळानंतर ही वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.