नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकपणे H-1B व्हिसाचे शुल्क वाढवले. अमेरिकेतील H-1B व्हिसा घेण्यासाठी तब्बल 88 लाख 76 हजार 390 भारतीय रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. त्यामुळे, भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. कारण, आयटी आणि इतर क्षेत्रात काम करणारे हजारो भारतीय अमेरिकेत नोकरीसाठी प्रयत्न करत असतात.
मात्र, आता इतक्या प्रचंड खर्चामुळे अनेकजण अमेरिकेऐवजी इतर देशांचा विचार करत आहेत. अशातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी एक मोठे विधान केले आहे की, ज्या परदेशी कामगारांना अमेरिकेत व्हिसा मिळणे कठीण जात आहे, आम्ही त्यांचे स्वागत करणार’.
Breaking: Canada plans to attract US H1B visa holders hit by Trump's visa fee hike "Not as many H1B visa holders will get visas in the US. These people are skilled and it is an opportunity for Canada. We will have an offering on this soon," says Canadian PM Mark Carney pic.twitter.com/cFUZDm12S1 — Shashank Mattoo (@MattooShashank) September 27, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, लंडन येथील पत्रकारांशी संवाध साधताना कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी एक मोठे विधान केले. कार्नी म्हणाले की, ‘कॅनडा देशासाठी एक संधी आहे. सुरुवातीला एच-1बी व्हिसा घेऊन अमेरिकेला जाणारे काही लोक आता कॅनडामध्ये येण्यास इच्छुक असतील. विशेषत: तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल व्यक्ती जे मेहनती आणि उद्योजक आहेत’. यादरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान मार्क यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘लवकरच आम्ही एक प्रस्ताव घेऊन येणार आहोत. हे लोक केवळ कुशल नाहीत, तर नवीन संधींसाठीही उत्सुक आहेत. कॅनडा देशासाठी ही एक सुवर्णसंधी आहे’.
नेमकं प्रकरण काय?
23 सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक H-1B व्हिसाचे शुल्क तब्बल 88 लाख 76 हजार 390 भारतीय रुपयांपर्यंत वाढवल्याने अमेरिकन कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांची तारांबळ उडाली. विशेषत: असे अमेरिकन कर्मचारी जे सुट्ट्यांसाठी भारतात आले होते.
काही अमेरिकन कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तातडीने आदेश दिले आहेत की, ‘तात्काळ अमेरिकेत परत या, अन्यथा एक लाख डॉलर्स भरा’. हा आदेश मिळताच अनेक कर्मचाऱ्यांनी मिळेल त्या किंमतीत फ्लाइट तिकीट घेऊन घाईगडबडीत अमेरिकेला परतीचा प्रवास सुरू केला. इतकंच नाही, 27 सप्टेंबर रोजी दुपारी दिल्ली – न्युयॉर्क या मार्गावरील एकेरी इकॉनॉमी तिकिटाची किंमत तब्बल 1.05 लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती.
ही परिस्थिती केवळ सध्या सुट्टीसाठी आलेल्या प्रवाशांपुरती मर्यादित नाही. दिवळीत भारतात येण्याचा बेत आखलेले अनेक भारतीय आयटी कर्मचारी आणि व्यावसायिकांनी आपला प्रवास रद्द केला आहे. काहींच्या घरात दिवाळीनंतर लग्नाचे सोहळे नियोजित होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळे त्यांना त्यांचे लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, एक्स युजर कौस्तव मजूमदार यांनी पोस्ट करत म्हटले की, ‘सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरून भारतात दुर्गापूजेसाठी येणाऱ्या प्रवाशांनी भरलेले एक विमान उड्डाणासाठी सज्ज होते. मात्र, जेव्हा व्हिसा शुल्कवाढीची बातमी समोर आली, तेव्हा अनेक कर्मचाऱ्यांनी घाबरून विमानातून उतरण्याची मागणी केली. मात्र, विमानाची तयारी पूर्ण झाल्याने ही मागणी नाकारण्यात आली’. या संपूर्ण घडामोडीमुळे अमेरिकेत काम करणाऱ्या हजारो भारतीयांचे भविष्य डळमळीत झाले आहे. व्हिसा शुल्कवाढ किती काळ लागू राहणार आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम काय होणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.