राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षनेत्यांनी कंबर कसली असून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसंदर्भात ८ जून रोजी मुंबईत भाजपाची बैठक होणार आहे.
राज्यसभा निवडणुकींबाबत ८ जून रोजी पार पडणाऱ्या बैठकीत भाजप रणनिती ठरवणार आहे. दरम्यान, प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रविवारीसुद्धा भाजपची बैठक पार पडली. भाजप कार्यालयात भाजप महाराष्ट्र प्रभारी आश्विनी कुमार वैष्णव यांच्या उपस्थितीत राज्यसभा निवडणुकी संदर्भात भाजपची बैठक पार पडली. भाजपाचे अनेक बडे नेते या बैठकीला उपस्थित होते.
राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जागा सहा आणि उमेदवार सात आहेत. त्यामुळे सहाव्या जागेवरून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. तसेच राज्यसभेच्या निवडणुकींसाठी मविआला अपक्ष आमदारांची साथ मिळेल का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणुक चुरशीची होणार असून निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.