Online Birth Certificate: वय कितीही असो, आता जन्मदाखला मिळवणं झालंय अगदी सोपं! ‘या’ एका वेबसाइटवर होईल काम; वाचा आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी

आता कोणत्याही वयातील व्यक्तीला घरबसल्या ऑनलाइन जन्मदाखला काढता येतो.

Online Birth Certificate: वय कितीही असो, आता जन्मदाखला मिळवणं झालंय अगदी सोपं! ‘या’ एका वेबसाइटवर होईल काम; वाचा आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी

'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ही म्हण आपल्याकडे बरीच प्रचलित आहे. विशेषतः जन्मदाखल्यासारखे (Birth Certificate) अत्यंत महत्त्वाचे आणि पायाभूत कागदपत्र काढायचे म्हटले की, सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवणे आणि भल्यामोठ्या रांगांमध्ये तासन् तास उभे राहणे आलेच. पण, आता डिजिटल युगात हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सरकारी कचेऱ्यांच्या खेट्या मारण्याची ही कटकट आता कायमची संपली असून, कोणत्याही वयातील व्यक्तीला आता घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाइन जन्मदाखला मिळवणे शक्य झाले आहे.

केंद्र सरकारच्या नागरी नोंदणी प्रणालीच्या (CRS) माध्यमातून ही अत्यंत सुटसुटीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना आता www.dc.crsorgi.gov.in किंवा www.crsorgi.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन जन्म प्रमाणपत्रासाठी थेट अर्ज करता येणार आहे. सर्वात मोठी आणि दिलासादायक बाब म्हणजे, या पोर्टलवर केवळ नवजात बालकांचाच नव्हे, तर कोणत्याही वयोगटातील ज्येष्ठ व्यक्तीचा जन्मदाखला काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे तुमचा किंवा घरातील कोणाचा जुना जन्मदाखला गहाळ झाला असेल किंवा आजवर काढलाच नसेल, तर आता चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही.

या ऑनलाइन प्रक्रियेत वयानुसार कागदपत्रांच्या निकषांमध्ये प्रशासनाने थोडाफार बदल केला आहे. जर बाळ अवघ्या 21 दिवसांपेक्षा लहान असेल, तर जन्मदाखला मिळवणे ही अत्यंत साधी आणि वेगवान प्रक्रिया आहे. अशा नवजात बालकांसाठी केवळ रुग्णालयाने दिलेली 'डिस्चार्ज स्लिप' (Discharge Slip) किंवा माता-बालक संगोपन कार्ड अपलोड करणे पुरेसे ठरते. या एकाच कागदपत्राच्या आधारे कोणतीही कायदेशीर कटकट न होता बाळाचा जन्मदाखला काही दिवसांतच तयार होऊन मिळतो.

हेही वाचा: Google Gemini New Feature: तुमच्या आवडीनिवडी ओळखणार अन् Gmail फोटोजमधून माहिती शोधणार; Google Gemini आता होणार तुमचा 'पर्सनल असिस्टंट'

मात्र, जर जन्मानंतर 21 दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला असेल किंवा एखाद्या प्रौढ वा ज्येष्ठ व्यक्तीचा जन्मदाखला नव्याने काढायचा असेल, तर काही अतिरिक्त कायदेशीर बाबींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे उपविभागीय दंडाधिकारी अर्थात 'एसडीएम आदेश' (SDM Order) होय. याशिवाय, 10 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी वकिलाकडून तयार केलेले प्रतिज्ञापत्र (Affidavit) आणि ओळखीचा भक्कम पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी एक ओळखपत्र पोर्टलवर सादर करावे लागते.

असा करा ऑनलाइन अर्ज:

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम www.crsorgi.gov.in या पोर्टलवर भेट देऊन प्राथमिक नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर मिळालेल्या 'युजर आयडी' आणि 'पासवर्ड'च्या साहाय्याने खात्यात लॉगिन करावे. त्यानंतर मुख्य पृष्ठावरील 'Apply for Birth Certificate' या पर्यायावर क्लिक करून समोर आलेला फॉर्म काळजीपूर्वक भरावा. या फॉर्ममध्ये जन्मतारीख, जन्मठिकाण आणि पालकांची नावे यांसारखी माहिती अचूक भरणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही त्रुटी राहणार नाही.

माहिती भरून झाल्यावर वयानुसार आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे स्पष्टपणे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करावीत. हा फॉर्म अंतिमरीत्या सबमिट (Submit) केल्यानंतर स्क्रीनवर एक 'रेफरन्स नंबर' (Reference Number) जनरेट होईल. हा क्रमांक अतिशय महत्त्वाचा असून, तो जपून ठेवणे गरजेचे आहे. याच क्रमांकाच्या आधारे अर्जदाराला आपल्या जन्मदाखल्याच्या अर्जाची सद्यस्थिती (Status) घरबसल्या तपासता येते. थोडक्यात सांगायचे तर, योग्य कागदपत्रांची जुळवाजुळव केल्यास तुमचा जन्मदाखला आता फक्त तुमच्या स्मार्टफोनच्या एका क्लिकच्या अंतरावर आहे.

हेही वाचा: Ajit Agarkar: BCCI चा मोठा निर्णय; मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या कार्यकाळाला 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number