सलमान खानचा बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शो 'बिग बॉस 19' 16 स्पर्धकांसह 24 ऑगस्टपासून जिओ हॉटस्टार आणि कलर्स टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. 24 ऑगस्टला 16 स्पर्धकांसह सुरू झालेल्या शोमध्ये नंतर शहबाज बदेश आणि मालती चाह या दोन वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे एकूण 18 स्पर्धक झाले. बिग बॉस 19 च्या अंतिम सोहळ्याचा दिवस जवळ आला आहे. यादरम्यान 7 डिसेंबर रोजी म्हणजेच आज सलमान खान बिग बॉस शोच्या 19 व्या सीझनच्या विजेत्याचे नाव जाहीर करेल.
चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला मत देऊन त्याला 'बिग बॉस 19' चा विजेता बनवण्याची संधी होती. मात्र, मतदानाची प्रक्रिया रविवार, 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता बंद झाली. फिनालेपूर्वी, शोशी संबंधित अनेक अपडेट्स समोर येत आहेत. या शोची अंतिम फेरी पाहण्यासठी प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. मात्र यावेळी 'मेकर्स'कडून बिग बॉसच्या 19 व्या सिझनच्या ग्रॅंड फिनालेच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे.
बिग बॉस 19 शो जवळपास साडेतीन महिने टेलिव्हिजनवर रात्री 10.30 वाजता आणि ओटीटी ॲपवर रात्री 9 वाजता पाहायला मिळत होता. मात्र शोच्या अंतिम सोहळ्याच्या दिवशी टीव्ही आणि ओटीटी या दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी प्रसारित होणार आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मवर रात्री 9 वाजल्यापासून थेट ग्रँड फिनालेचे टेलिकास्ट सुरू होणार आहे.
सलमान खानचा गाजलेला रिॲलिटी शो 'बिग बॉस 19' आता विजेत्याच्या घोषणेसह 7 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे. गौरव खन्ना, अमाल मलिक, फरहाना भट्ट, प्रणित मोरे आणि तान्या मित्तल या सिझनच्या टॉप 5 फायनलिस्टमध्ये ट्रॉफीसाठी तगडी लढत पाहायला मिळणार आहे. या पाच जणांपैकी कोण बाजी मारणार आणि विजेतेपदाचा मान कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.