Digital Detox: आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. काम असो किंवा मोकळा वेळ आपण नकळत सोशल मीडियावर स्क्रोल करत राहतो. हीच सवय हळूहळू 'डूमस्क्रोलिंग'मध्ये बदलते आणि वेळ वाया जाण्याबरोबरच मानसिक थकवाही वाढतो. जर तुम्हालाही ही सवय कमी करायची असेल, तर काही स्मार्ट अॅप्स तुमची नक्कीच मदत करू शकतात.
सर्वप्रथम Minimalist Phone हे अॅप तुमचा फोन अगदी साधा आणि डिस्ट्रॅक्शन-फ्री बनवते. यात रंगीत आयकॉन्सऐवजी फक्त टेक्स्ट-आधारित इंटरफेस असतो, त्यामुळे लक्ष विचलित होण्याची शक्यता कमी होते. याशिवाय, सोशल मीडिया अॅप्स ब्लॉक करणे, त्यांचा वापर वेळ ठरवणे किंवा नाव बदलणे अशा सुविधा यात उपलब्ध आहेत.
दुसरं उपयुक्त अॅप म्हणजे One Sec. हे अॅप तुम्हाला अचानक अॅप उघडण्यापासून थांबवतं. जसं तुम्ही एखादं सोशल मीडिया अॅप उघडता, तसं हे काही सेकंद थांबायला सांगतं. या छोट्या ब्रेकमुळे तुम्ही विचार करता की खरंच अॅप वापरण्याची गरज आहे का.
फोकस वाढवण्यासाठी Forest हे अॅप खूप लोकप्रिय आहे. यात तुम्ही कामावर लक्ष केंद्रित केल्यावर एक व्हर्च्युअल झाड वाढतं. पण जर तुम्ही मध्येच फोन वापरला, तर ते झाड नष्ट होतं. हा गेमसारखा अनुभव तुम्हाला शिस्तीत राहायला मदत करतो.
तसेच, Freedom हे अॅप एकाच वेळी फोन, लॅपटॉप आणि ब्राउजरवर काम करतं. तुम्ही ठराविक वेळेसाठी काही अॅप्स किंवा वेबसाइट्स ब्लॉक करू शकता. काम करताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून हे अॅप खूप उपयोगी ठरतं.
शेवटी, ScreenZen हे अॅप तुम्हाला अॅप वापरावर नियंत्रण ठेवायला मदत करतं. तुम्ही ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त वापर केल्यास हे अॅप तुम्हाला थांबण्याचा इशारा देतं. शिवाय, “तुम्ही हे अॅप का उघडलं?” असे प्रश्न विचारून तुमच्यात जागरूकता निर्माण करतं.
डूमस्क्रोलिंगची सवय एकदम थांबवणं अवघड असलं, तरी योग्य साधनांच्या मदतीने ती कमी करता येते. हे अॅप्स केवळ तुमचा वेळ वाचवणार नाहीत, तर तुमची उत्पादकता आणि मानसिक शांतताही वाढवतील. त्यामुळे आजपासूनच या अॅप्सचा वापर करून तुमच्या डिजिटल सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवा.