Batatyachi Chal Marathi Theatre: चाळ पुन्हा रंगणार! पुलंची ‘बटाट्याची चाळ’ नव्या संगीतिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

गीत, संगीत, अभिनय आणि नृत्य यांच्या माध्यमातून चाळीतील व्यक्तिरेखा आणि त्यांचे रंगतदार जीवन रसिकांना अनुभवता येणार आहे.

Batatyachi Chal Marathi Theatre: चाळ पुन्हा रंगणार! पुलंची ‘बटाट्याची चाळ’ नव्या संगीतिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी साहित्य आणि रंगभूमीवर अमिट छाप उमटवणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाट्याची चाळ’ या लोकप्रिय साहित्यकृतीतील आठवणींना आता नव्या संगीत रूपात रंगमंचावर साकारले जाणार आहे. ‘या इथे चाळ बटाट्याची’ या भव्य मराठी संगीतिकेच्या माध्यमातून पुलंच्या चाळविश्वातील विनोद, माणुसकी आणि भावनांचा पट प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. दोन अंकी असलेल्या या अनोख्या संगीतप्रयोगात 21 कलाकार सहभागी होणार असून, विशेष म्हणजे हा प्रयोग गद्य संवादांशिवाय सादर केला जाणार आहे. गीत, संगीत, अभिनय आणि नृत्य यांच्या माध्यमातून चाळीतील व्यक्तिरेखा आणि त्यांचे रंगतदार जीवन रसिकांना अनुभवता येणार आहे.

पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून साकारलेली चाळ म्हणजे केवळ इमारत नसून, विविध स्वभावांच्या माणसांनी भरलेले एक भावविश्व होते. याच भावविश्वाला आधुनिक रंगभाषेची जोड देत ‘या इथे चाळ बटाट्याची’ ही संगीतिक साकारण्यात आली आहे. जुन्या आठवणींचा गंध आणि नव्या सादरीकरणाची शैली यांचा सुंदर मेळ या प्रयोगात पाहायला मिळणार आहे.

या संगीतिकेचे मूळ लेखन आणि संगीत पु. ल. देशपांडे यांचे असून, कपीश जोशी यांच्या निर्मितीत हा प्रयोग रंगणार आहे. देवेंद्र भोमे आणि योगेश सप्रे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून, देवेंद्र भोमे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. योगेश सप्रे यांनी या साहित्यकृतीचे नाट्यरूपांतर केले आहे.

पंढरीनाथ कांबळे, अजित परब, मिलिंद जोशी, आशुतोष मुंगळे, अंजली मराठे, शमिका भिडे, स्वरांगी मराठे, केतन पवार, वज्रांग आफळे, मधुरा आफळे, तन्वी परांजपे, इशिता सावळे आणि साक्षी देशपांडे यांसारखे कलाकार या प्रयोगाचा भाग असणार आहेत.या संगीतिकेला मंदार बगाडे, ओमकार जोशी, सई जोशी, सिद्धी देशपांडे, तनिष्का जोशी, दीप वैद्य, स्वप्नील कुंभार आणि केदार जाधव यांच्या वाद्यवृंदाची साथ लाभणार आहे. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य, सुजय भडकमकर यांची प्रकाशयोजना, गायत्री चक्रदेव यांची वेशभूषा आणि मधुरा आफळे यांची नृत्यरचना या प्रयोगाला अधिक समृद्ध करणार आहे. मराठी संगीत रंगभूमीची परंपरा आणि आधुनिक प्रयोगशीलतेचा संगम साधणारी ही संगीतिक पुलप्रेमी रसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. जुन्या पिढीच्या आठवणींना उजाळा देतानाच नव्या प्रेक्षकांना पुलंच्या चाळविश्वाची ओळख करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number