जर तुमचे बँक ऑफ बडोदा (BoB) मध्ये खाते असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेशी संबंधित काही संवेदनशील माहिती डार्क वेबवर लीक झाल्याचा दावा समोर आला आहे. विविध अहवालांनुसार, या डेटाचा आकार सुमारे 700 GB ते 1 TB दरम्यान असू शकतो. मात्र, लीक झालेल्या माहितीची नेमकी व्याप्ती आणि प्रमाण याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
वृत्तसंस्था 'रॉयटर्स'च्या अहवालानुसार, प्राथमिक तपासात एका कर्मचाऱ्याचे ई-मेल खाते हॅक झाल्याचे समोर आले आहे. याच माध्यमातून सायबर हल्लेखोरांनी काही संवेदनशील कागदपत्रांमध्ये प्रवेश मिळवल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या डेटामध्ये ग्राहकांची खात्याशी संबंधित कागदपत्रे, कर्जविषयक फाइल्स आणि ऑडिटशी संबंधित काही नोंदींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
काही ऑनलाइन अहवालांमध्ये खातेदारांची वैयक्तिक माहिती, खाते क्रमांकाशी संबंधित तपशील, कर्जविषयक माहिती, नेट बँकिंगशी संबंधित डेटा, KYC कागदपत्रे तसेच NRI आणि कॉर्पोरेट बँकिंगशी संबंधित अंतर्गत दस्तऐवज लीक झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, या सर्व माहितीच्या गळतीबाबत बँक किंवा संबंधित यंत्रणांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बँक ऑफ बडोदाने स्पष्ट केले की, घटना एका कर्मचाऱ्याच्या ई-मेल खात्यापुरती मर्यादित आहे. बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीवर कोणताही परिणाम झालेला नाही आणि ग्राहकांच्या खात्यांमधील रकमेवरही परिणाम झाल्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. बँकेने या घटनेचा फॉरेन्सिक तपास सुरू केला असून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला जात असल्याचेही सांगितले आहे.
बँक ऑफ बडोदा खातेदारांनी काय काळजी घ्यावी?
या घडामोडीनंतर घाबरण्याची गरज नसली, तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे. बँकेच्या नावाने येणारे संशयास्पद फोन कॉल, SMS, ई-मेल किंवा व्हॉट्सॲप संदेशांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही परिस्थितीत OTP, ATM PIN, CVV, नेट बँकिंगचा पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नका.
तसेच, आपल्या बँक खात्यातील व्यवहार नियमित तपासा आणि SMS किंवा ई-मेल अलर्टवर लक्ष ठेवा. कोणताही संशयास्पद व्यवहार दिसल्यास तातडीने बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्राशी किंवा जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
जर तुम्ही ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे बळी ठरलात, तर विलंब न करता 1930 या राष्ट्रीय सायबर फसवणूक हेल्पलाइनवर संपर्क साधा आणि अधिकृत सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदवा.