पाकिस्तानपासूनच्या स्वातंत्र्याची घोषणा केल्यानंतर काही आठवड्यांनी, ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ने सोमवारी 11 ऑगस्ट हा दिवस बलुचिस्तानचा ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून जाहीर केला आहे. हा दिवस जगभरात तो साजरा करण्याचे आवाहन केले आहे. एका निवेदनाद्वारे, ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ने बलुच जनतेला हा दिवस राष्ट्रीय एकजुटीने साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाला ‘स्वतंत्र आणि सार्वभौम बलुचिस्तान’ म्हणून या भूभागाला मान्यता देण्याचे आवाहनही केले. बलुच मुक्ती चळवळीचे नेते मीर यार बलुच यांनी आवाहन केले की, बलुचिस्तानमधील लोकांनी आपल्या घरांवर, परिसरांमध्ये, बाजारपेठांमध्ये, दुकानांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र बलुचिस्तानचा राष्ट्रध्वज फडकवावा. या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
निवेदनानुसार, ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ 11 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन मानतो आणि हा दिवस दरवर्षी साजरा केला जाईल, असे त्यात म्हटले आहे. भारतीय उपखंडाच्या फाळणीमुळे या संपूर्ण प्रदेशात दीर्घकाळ चाललेला संघर्ष, अशांतता, दहशतवाद, आर्थिक अस्थिरता आणि राजकीय संकटे निर्माण झाली, असा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या धोरणांचा परिणाम केवळ या प्रदेशावरच नव्हे, तर जगाच्या इतर भागांवरही झाला आहे, असा आरोपही यात करण्यात आला आहे. या निवेदनात काश्मीर, मार्च 1948 मधील बलुचिस्तानमधील लष्करी कारवाई, 1971 मधील पूर्व पाकिस्तानमधील संघर्ष, जॉर्डनमधील पॅलेस्टिनींशी संबंधित कारवाया, सोव्हिएत-अफगाण युद्ध, चगाई जिल्ह्यातील 1998 मधील अणुचाचण्या आणि अमेरिकेतील 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतरच्या घडामोडींचा उल्लेख करण्यात आला आहे. या गटाने असा दावा केला की, या घटनांमुळे या प्रदेशात अस्थिरता, संघर्ष आणि रक्तपात निर्माण झाला आहे.
The Republic of Balochistan announces worldwide celebrations of August 11 as the Independence Day of Balochistan with national unity 3 August, 2026 On this occasion, the residents of the Baloch nation will hoist the national flag of independent Balochistan in their homes,… pic.twitter.com/CsDZqWAC8x — Mir Yar Baloch (@miryar_baloch) August 3, 2026
‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ने म्हटले आहे की, जोपर्यंत पाकिस्तानचे सध्याचे स्वरूप कायम आहे, तोपर्यंत शाश्वत शांतता, विकास आणि समृद्धी साध्य होऊ शकत नाही. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचे आणि त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्या निवेदनात असेही म्हटले आहे की, ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ आणि त्यांचे 6 कोटी बलुच लोक स्वतःला एक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र मानतात. त्या गटाच्या निवेदनानुसार, उपखंडातून ब्रिटीश राजवट माघार घेत असताना 11 ऑगस्ट 1947 रोजी बलुचिस्तानने सर्वप्रथम आपली स्वतंत्रता जाहीर केली होती. या घोषणेची बातमी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’सह आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिली होती. तसेच ‘ऑल इंडिया रेडिओ’वरूनही ती प्रसारित करण्यात आली होती, असा दावा त्यात करण्यात आला आहे. या भूमिकेच्या आधारे, त्या गटाने म्हटले आहे की, बलुच राष्ट्र 11 ऑगस्ट हा दिवस आपला स्वातंत्र्यदिन म्हणून पाळत आले आहे. भविष्यातही हा दिवस साजरा करत राहील. दरम्यान, पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी, तर भारत 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो.