विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होणार असून तसा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांच्या मान्यतेची प्रतिक्षा असल्याची माहिती मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात ९ मार्च रोजी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे महाविकास आघाडी सरकारचे नियोजन होते. मात्र, त्यास राज्यपालांकडून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही. त्यानंतर आता पुन्हा विधानसभा अध्यक्षपदाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावास राज्यपालांच्या मान्यतेची प्रतीक्षा राज्य सरकारला आहे.
मंत्री विजय वड्डेटीवार यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी साथ दिली असून पुढील तीन महिन्यात अहवाल देण्याची आयोगाला विनंती केली असल्याचे वड्डेटीवार म्हणाले आहेत. तसेच ओबीसी आरक्षणासाठी राज्यसरकार सर्वत्तोपरी मदत करणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यपालांची ओबीसींच्या अध्यादेशावर स्वाक्षरी झाली असून लवकरच ओबीसी राजकीय आरक्षण प्रश्न सुटेल, असा विश्वास मंत्री विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केला आहे.