महाराष्ट्रातल्या राजकारणात मागच्या महिना भरापासून रोज नव्या घडामोडी उजेडात येत आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप पक्ष प्रवेश अशा घटनांचा समावेश आहे. शिंदे गट वेगळा झाल्यापासून महाराष्ट्रात शिवसेना अस्थिर झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पक्ष आणि चिन्ह कोणाचं याबाबत न्यायालयात प्रकरण सुरु आहे. लढाई दोन्ही बाजूकडून अस्तित्वाची झाली आहे. त्यातचं संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. त्याची चर्चा अधिक आहे. उद्धव ठाकरेंनी फुटलेल्या आमदारांवरती सडकून टीका केली आहे. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या राजकीय घडामोंडीची त्यांनी उत्तरे दिली आहेत. माझे सरकार गेले, मुख्यमंत्री पद गेले याची अजिबात खंत नाही. पण माझी माणसं दगाबाज निघाली असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना इथे सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले. असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील विश्वासघातकी सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुफानी मुलाखत ‘सामना’ला दिली. महाराष्ट्रातील सरकार का पाडले, कसे पाडले इथपासून शिवसेनेच्या भवितव्यापर्यंतच्या प्रत्येक प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी खणखणीत उत्तरे दिली.
मुख्यमंत्रीपदी असताना या काळात उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया देखील झाल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे राज्यभर फिरले नाही, असंही सांगण्यात आलं. याबद्दल विचारताच शस्त्रक्रियेविषयी बोलताना उद्धव ठाकरे भावूक झाले. ‘शस्त्रक्रियेनंतर एकदा मानेखालील शरीराची हालचाल बंद पडली होती,’ असं त्यांनी सांगितलं. “काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या,” असा मोठा आणि गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. शिवसेनेकडे आम्ही पक्ष नव्हे परिवार म्हणून पाहिलं. ज्यांना पक्ष संभाळायला दिला त्यांनीच विश्वासघात केला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.