सुरांच्या विश्वात आज एक गूढ शांतता पसरली आहे. ज्या आवाजाने दशकेभर भावना, प्रेम, वेदना आणि उत्साहाला स्वर दिले, तोच आवाज आज कायमचा थांबला. महाराष्ट्राच्या सूरसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका Asha Bhosle यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर दुःखाची सावली दाटून आली आहे. शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
आशा भोसले यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांना अनेक वैद्यकीय समस्या होत्या आणि उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एकामागोमाग एक अवयव निकामी होत गेल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि अखेरीस त्यांचं निधन झालं. जीवनाच्या या अखेरच्या टप्प्यावरही त्यांनी जिद्दीने लढा दिला, पण नियतीसमोर प्रत्येकाला नतमस्तक व्हावंच लागतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
92 वर्षांच्या वयातही आशा भोसले यांनी त्यांची ऊर्जा आणि संगीतावरील प्रेम कायम ठेवले होते. त्यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त दुबईमध्ये आयोजित विशेष लाइव्ह कॉन्सर्टमध्ये त्यांनी तब्बल तीन तास रंगतदार सादरीकरण केले होते. त्या वेळी त्यांच्या स्टेजवरील उत्साहाने आणि जोशपूर्ण उपस्थितीने सर्वांनाच प्रेरित केले होते.
त्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी संगीताविषयी त्यांच्या भावना व्यक्त करत सांगितले होते की, “संगीत माझ्यासाठी श्वासासारखे आहे. मी आयुष्यभर संगीतासाठी जगले आहे.” त्यांनी अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात संगीत क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले असून, त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
आशा भोसले यांनी विविध प्रकारची गाणी गात आपल्या गायकीचा ठसा उमटवला आहे. मात्र त्यांनी अधिक भाषांमध्ये गाणी गाण्याची आणि शास्त्रीय संगीतात अधिक काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्पर्धात्मक आणि राजकारणाने भरलेल्या चित्रपटसृष्टीत टिकून राहणे सोपे नसल्याचेही त्यांनी मान्य केले होते.