अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांच्याबद्दल विविध प्रकारची वक्तव्ये आणि दावे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अमृता खानविलकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. अमृता खानविलकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर काही चुकीची वक्तव्ये केली जात असून, त्यातून त्यांची बदनामी होत असल्याचे त्यांच्या पोस्टमधून समोर आले आहे. अशा प्रकारे कोणतीही खात्रीशीर माहिती नसताना वक्तव्ये करणे किंवा ती सोशल मीडियावर पसरवणे थांबवावे, असा स्पष्ट संदेश तिने दिला आहे.
अभिनेत्रीने यापुढे अशा प्रकारच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष न करता कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने चुकीची माहिती, अफवा किंवा बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमृता खानविलकर आणि अभिनेता हिमांशू मल्होत्रा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दोघांनी अलीकडेच त्यांच्या नात्याबाबत भूमिका स्पष्ट करत आपण अद्याप विवाहित असल्याचे सांगितले आहे. मात्र, यापलीकडे आपल्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अमृता खानविलकरने याआधीही सोशल मीडिया ट्रोलिंग आणि आक्षेपार्ह कमेंट्सवर संताप व्यक्त केला होता. त्यामुळे यावेळी चुकीची माहिती आणि बदनामीकारक वक्तव्यांविरोधात त्या कायदेशीर पाऊल उचलणार असल्याची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.