बाबरी पाडण्याबाबत सेनाभवनात कोणतीही योजाना आखली नाही, तर बाबरी पाडताना बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक तेथे नव्हते, असे वक्तव्य भाजपा नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी वादग्रस्त वक्तव्य खपवून घेतली जाणार नाही, अशी सक्त ताकीद अमित शाह यांनी चंद्रकांत पाटील यांना दिली आहे.
अमित शाह म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वादग्रस्त वक्तव करण्याऐवजी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर बोला. तसेच, अशी वादग्रस्त वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत, असी सक्त ताकीदही अमित शाह यांनी चंद्रकांत पाटील यांना दिली आहे. दरम्यान, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिल्लीत भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत शाह यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचं समोर आलं आहे.
अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली आहे. त्यावेळी तेथे शिवसेनेचा एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. उद्धव गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत बाबरी पाडल्याबाबत नेहमीच बोलतात. मात्र, प्रश्न असा आहे की, त्यावेळी ते अयोध्येत होते का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून उद्धव गट आक्रमक झाला आहे. उद्धव गटाकडून भाजपाच्या हिंदुत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसेच गोमुत्रधारी हिंदुत्व देशाच्या कामाचं नाही, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा शिंदेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा नको तर हकालपट्टी करावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
अयोध्येत रामजन्म भूमीचे आंदोलन सुरू होते. तेव्हा सर्व कारसेवक प्रभू रामाचं मंदीर बांधण्यासाठी तेथे पोहचले होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदीसंदर्भात मांडलेली भूमिका व्यक्तीगत आहे, परंतु ती पक्षाची नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच रामजन्म भूमीचे आंदोलन हा एक मोठा विचार होता. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या समर्थनात हे आंदोलन करण्यात आले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक त्याठिकाणी नव्हते, असं म्हणणं चुकीचं आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची व्यक्तिगत भूमिका आहे, पक्षाची नाही, असे बावनकुळे म्हणाले.