विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या ईव्हीएमवरील विधानावर उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप नोंदवला आहे. अजित पवार यांचा ईव्हीएमवर विश्वास असेल. मात्र, देशाचा विश्वास नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे आता ईव्हीएमवरून राष्ट्रवादी आणि उद्धव गटात मतभेद पाहायला मिळत आहे.
संजय राऊत म्हणाले, अजित पवार हे महाविकास आघाडीमधील सहकारी आहेत. अजित पवारांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. हे त्यांचे मत झाले. मात्र, देशातील लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. भाजपाच्या भक्त आणि अंधभक्तांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. त्यामुळे अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे मला वाटत नाही, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, देशाला महागाई, बेरोजगारीने झोडपून काढले आहे. त्याचवेळी घटनात्मक पदावर बसलेल्या संविधानाची शपथ घेतलेल्यांकडे पदवी असायलाच हवी असे नाही. मात्र, देशातील लाखो पदवीधर हे बेरोजगार असल्याचे संजय राऊत म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेत अजित पवार यांनी ईव्हीएमचे समर्थन केले आहे. ईव्हीएमवर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. एक व्यक्ती ईव्हीएममध्ये फेरफार करू शकत नाही, ही एक मोठी यंत्रणा आहे. ईव्हीएमवर घोळ करता आला असता तर देशातील अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षनेते सत्तेत आले नसते. या देशात कुणीही गडबड करू शकत नाहीत. पराभव झालेला पक्ष ईव्हीएमला दोषी ठरवत आहेत, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते.
शरद पवार यांनी ईव्हीएमविरोधात भूमिका मांडली आहे. शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, कपिल सिब्बल यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगात जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, अजित पवारांनी ईव्हीएमच्या समर्थनात भूमिका मांडली. तर, या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद असल्याचे दिसून येत आहे. तर आता उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या विधानावर आक्षेप नोंदवला आहे.