निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे. तर उद्धव गटाने १६ आमदार अपात्रेची याचिका दाखल केली आहे. दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. असे असताना, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. अजित पवार हे भाजपासोबत जाणार असल्यांबाबत ट्विट अंजली दमानिया यांनी केलं आहे. तसेच सरकारमधील १५ आमदार बाद होणार असल्याचेही दमानिया यांनी म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत असून त्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अंजली दमानिया यांनी ट्विट केले की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत. तेही लवकर बघू. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची. असे त्यांनी ट्विट त्यांनी केलं आहे.
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच बघू….. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची — Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 11, 2023
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार मागील आठवड्यात नॉट रिचेबल होते. मात्र, याबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. तर दुसरीकडे शरद पवार भाजपासाठी अनुकूल वक्तव्यं करताना दिसत आहेत. असे असताना, अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत जाणार का, या चर्चेला उधाण आले आहे.