Air India Aircraft: धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात तोच बिघाड, ‘या’ कारणामुळे लंडन विमानतळावर मोठी खळबळ

या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून एअर इंडियाने ताफ्यातील सर्व बोईंग 787 विमानांच्या स्विचेसची तपासणी केली आहे.

Air India Aircraft: धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात तोच बिघाड, ‘या’ कारणामुळे लंडन विमानतळावर मोठी खळबळ

लंडन: सुरक्षेच्या बाबतीत 'दूध पोळले की ताकही फुंकून प्यावे लागते', याचा प्रत्यय सोमवारी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर आला. लंडनहून बेंगळुरूला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर (AI 132) विमानात उड्डाणापूर्वीच इंधन नियंत्रण यंत्रणेत (फ्युअल कंट्रोल स्विच) गंभीर बिघाड झाल्याचे समोर आले. इंजिन सुरू करताना पायलटने तातडीने हा बिघाड हेरला आणि संभाव्य धोका ओळखून विमानाचे उड्डाण रोखले. या घटनेमुळे विमानतळावर काही काळ चिंतेचे वातावरण होते, मात्र वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

नेमकी घटना काय?

विमान उड्डाणासाठी सज्ज होत असताना, इंजिन स्टार्ट करण्याच्या प्रक्रियेत 'फ्युअल कंट्रोल स्विच' दोन वेळा आपोआप 'कट ऑफ' पोझिशनला गेल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. इंधन पुरवठा नियंत्रित करणारा हा स्विच वारंवार बंद पडणे हे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत धोकादायक मानले जाते. या तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच विमान तातडीने सेवेतून कमी करून ग्राऊंडेड करण्यात आले. एअर इंडियाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत विमानाची मूळ निर्माती कंपनी 'बोईंग'ला सखोल तपासासाठी पाचारण केले आहे.

अहमदाबाद दुर्घटनेची भयावह आठवण

या तांत्रिक बिघाडाने गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेच्या जखमा पुन्हा ताज्या केल्या आहेत. याच 'फ्युअल कंट्रोल स्विच'मध्ये बिघाड झाल्यामुळे झालेल्या त्या दुर्दैवी अपघातात तब्बल 260 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एअर इंडियाने कोणतीही जोखीम न पत्करता विमान तातडीने दुरुस्तीसाठी पाठवले असून, सर्व प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: UPI transactions: जानेवारीत UPI ने गाठला विक्रमी टप्पा, तब्बल 28.33 लाख कोटींचे व्यवहार, देशभर डिजिटल क्रांतीला गती

पायलट असोसिएशनचे गंभीर आरोप

एकीकडे एअर इंडिया खबरदारी घेत असल्याचे सांगत असली, तरी फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स असोसिएशनने (FIP) यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बोईंग 787 विमानांच्या विद्युत प्रणालीमध्ये मूळ दोष असल्याचा दावा 'एफआयपी'ने केला आहे. विमानाच्या मुख्य इलेक्ट्रॉनिक्स बेमध्ये (Electronic Bay) पाण्याची गळती होण्याची शक्यता असते, ज्यामुळे इंधन नियंत्रण यंत्रणेत बिघाड होऊ शकतो. याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि डीजीसीएला (DGCA) वारंवार पत्र लिहूनही ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

एअर इंडियाकडून खबरदारीचे पाऊल

या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून एअर इंडियाने ताफ्यातील सर्व बोईंग 787 विमानांच्या स्विचेसची तपासणी केली आहे. सुदैवाने, इतर कोणत्याही विमानात असा दोष आढळलेला नाही. लंडन प्रकरणाचा संपूर्ण अहवाल आता डीजीसीएला सादर करण्यात आला असून, तांत्रिक तपासाअंतीच हे विमान पुन्हा आकाशात झेपावणार आहे. सध्यातरी या घटनेमुळे विमान प्रवासातील तांत्रिक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा: Budget 2026 : कोणाला मिळाला अर्थसंकल्पाचा मोठा वाटा? जाणून घ्या सविस्तर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number