ओवेसींच्या एमआयएमने महाविकास आघाडीसोबत युती करण्याची तयारी दाखवली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा मविआसोबत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युतीची तयारी दाखवल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावावर मविआच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एमआयएमला सोबत घेण्याबाबत राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वप्रथम सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला राष्ट्रवादीतूनच विरोध होत असल्याचे समोर आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला छेद देत एमआयएम हा राष्ट्रवादीचा समविचारी पक्ष आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. तर छगन भुजबळ यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यांचे सांत्वन करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जलील यांची भेट घेतली. त्यावरून एमआयएम आणि मविआच्या एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. जलील यांनी एमआयएमला भाजपाची बी टीम म्हणून हिणवणाऱ्या मविआ नेत्यांना सोबत घेण्याचे वक्तव्य केले आणि त्यावर टोपे यांनाही भूमिका घ्यावी लागली.