मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी दावोस दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात अंदाजे ३५ ते ४० कोटी रुपये खर्च झाला. म्हणजेच दिवसाला साडेसात ते दहा कोटी खर्च झाला, असा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या या आरोपालाच मंगळवारी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
‘आदित्य ठाकरे यांच्यात प्रगल्भता नाही. त्यांनी थोडे परिपक्व व्हायला हवे. तसेच त्यांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्यता नाही. त्यांना फक्त मताचे आणि हिताचे राजकारण करायचे आहे. आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहे. महाराष्ट्र हा जर्मनीपेक्षा मोठा आहे. मुख्यमंत्री चार्टर्ड फ्लाइट घेणे टाळतात. आणि शासनाच्या प्रत्येक पैशाचे ऑडिट असते. त्यामुळे शासनाकडे पै न पैचा हिशोब असतो.’ असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. दीपक केसरकर पुढे म्हणाले, परदेशी गुंतवणूकदारांना राज्याच्या प्रमुखांसोबत करार करायचे असतात. अन् ते दावोसलाच होतात. ही साधी गोष्ट कळत नसेल तर मी काय म्हणणार? मी आता त्यांच्यावर टीका करणार नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसा वापरला गेला. चार दिवसांचा खर्च तब्बल 35 ते 40 कोटी एवढा होता. कर्मशियल विमानाऐवजी ते चार्टर विमानाने गेले. गेले तर गेले पण सकाळी पोहचण्याऐवजी सायंकाळी पोहचले व त्यामुळे महाराष्ट्रासाठीच्या बैठका रद्द केल्या असा आरोप युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.