एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. गेल्या तीन महिन्यांहून अधिक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. संपकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर परतण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. तसेच सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी दिलेली मुदत आज ३१ मार्च रोजी संपली आहे. त्यामुळे संपकारी कर्मचाऱ्यांना नोकरीची गरज नसून, सरकार त्यांच्यावर कारवाई सुरू करणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केले आहे.
कामावर परतण्याची संपकारी कर्मचाऱ्यांना दिलेली मुदत आज संपली असून उद्यापासून संपकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.
तसेच, राज्य सरकार आता ११,००० कंत्राटी चालक आणि कंडक्टर भरतीसाठी टेंडर काढणार आहे. जे कामावर येणार नाहीत त्यांना नोकरीची गरज नाही, असे राज्य सरकारचे मत झाले आहे. त्यामुळे आता शिक्षेची कारवाई नियमानुसार पुन्हा सुरू होईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
दरम्यान, एसटी महामंडळ राज्यशासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या आंदोलनादरम्यान, अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अनेक कर्मचाऱ्यांवर बडतर्फी तसेच निलंबनाची कारवाई राज्य सरकारने केली आहे. विलिनीकरण होण्यास राज्य सरकारने नकार कळवला आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लालपरी रस्त्यावर धावत नाही आहे. राज्यात अनेक ठिकाणी एसटी बस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना प्रवास करण्यासाठी इतर खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. तसेच हे वाहनचालक प्रवाशांकडून कमी अंतराच्या प्रवासासाठीदेखील जास्तीचे पैसे आकारत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खीशाला कात्री लागत आहे. तसेच जोवर विलिनीकरण होत नाही, तोवर एसटी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत.