दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात महत्त्वाची घडामोड घडली. कॉक्रोज जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके यांनी जाहीर केलेले उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, केंद्र सरकारविरोधातील आंदोलन मात्र पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले. NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतर येथे आमरण उपोषण सुरू केले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली होती. शनिवारी सकाळी पोलिसांनी वांगचुक यांना ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेनंतर अभिजित दीपके यांनी स्वतः बेमुदत उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, पुढील घडामोडींमध्ये वांगचुक यांनी केलेल्या आवाहनाचा स्वीकार करत दीपके यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, उपोषण मागे घेतले असले तरी आंदोलनाची दिशा बदललेली नसल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले. आंदोलकांचा मोर्चा संसदेकडे निघाला असून शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधातील लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.